सिंधू, श्रीकांत स्पर्धेसाठी सज्ज!, गुरू पुल्लेला यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:27 AM2018-03-14T04:27:15+5:302018-03-14T04:27:15+5:30
भारतीय बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत हे उद्यापासून सुरू होणा-या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपसाठी सज्ज झाले आहेत.
बर्मिंघम : भारतीय बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत हे उद्यापासून सुरू होणाºया आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपसाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत ते विजयी निर्धाराने मैदानात उतरतील. १७ वर्षांपूर्वी गुरू पुल्लेला गोपीचंदने ही स्पर्धा जिंकत इतिहास नोंदवला होता. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी या दोन्ही खेळाडूंना असेल. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणे हे प्रत्येक बॅडमिंटनपटूचे स्वप्न असते. भारताकडून आतापर्यंत केवळ प्रकाश पदुकोण (१९८०) अणि गोपीचंद (२००१) यांनी ही स्पर्धा जिंकण्याची किमया केलेली आहे. सिंधू आणि श्रीकांत यांच्यापुढे पहिल्या फेरीत सोपे प्रतिस्पर्धी आव्हान आहे. मात्र, याच स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या सायना नेहवाल हिच्यापुढे जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या माजी विजेत्या चिनी तायपेच्या तेई झू यिंग हिचे आव्हान आहे. त्यामुळे सायनाची सुरुवातच कठीण असेल. तेई झू हिचा सायनाविरुद्धचा रेकॉर्ड ९-५ असा आहे. गेल्या सात सामन्यांत सायना तिच्याकडून पराभूत झालेली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा यात समावेश आहे. चौथ्या मानांकित सिंधूला थायलंडच्या पोर्नपावी चोचुवों हिच्याविरुद्ध खेळावे लागेल. मात्र, पुढील फेरीत इंडिया ओपनविजेती बेवेन झांग हिच्याविरुद्ध सामना होऊ शकतो. श्रीकांतला पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्राईस लीवरदेजच्या रुपात सोपे आव्हान आहे.
गोपीचंदच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बॅडमिंटन सध्या सुवर्ण अशा काळातून जात आहे. भारताजवळ आता विश्वस्तरीय खेळाडू आहेत. ज्यात लंडन आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना २०१५ मध्ये किताबाजवळ पोहोचली होती, मात्र अंतिम फेरीत तिला कॅरोलिन मारिनकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधू गेल्या वर्षी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली होती.
तेई झू हिने गेल्या वर्षी बºयाच स्पर्धा जिंकल्या. याचा अर्थ असा नव्हे, की केवळ भारतीयच तिच्याकडून पराभूत होत आहेत. सध्या ती सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. म्हणजे, आम्ही तिला पराभूत करू शकत नाही, असे नव्हे. - सायना नेहवाल
मी सहा आठवडे सराव केला. मला चांगल्या कामगिरीची आशा आहे. या वर्षी बºयाच स्पर्धा आहेत. मला माझे सर्वेश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागेल.
-पी. व्ही. सिंधू
आॅल इंडिया ही प्रतिष्ठित स्पर्धा आहे. ज्याला १०० वर्षांचा इतिहास आहे. प्रकाश सर आणि गोपीचंद सर यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. ही आमच्यासाठी प्रेरणा देणारे काम करेल. किताब जिंकून खेळाडू महान बनतात, असे हे उदाहरण आहे. आम्हीसुद्धा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू.
-श्रीकांत