पी. व्ही. सिंधू, प्रणॉय यांचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 03:36 AM2018-07-07T03:36:06+5:302018-07-07T03:36:19+5:30
पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाने भारताचे आज इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
जकार्ता : पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाने भारताचे आज इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
सिंधूला जगातील सातव्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या ही बिंगजियाओ हिच्याकडून २१-१४, २१-१५ असा पराभव पत्करावा लागला. सिंधूचा तिच्याविरुद्ध ११ सामन्यांतील हा सहावा पराभव होता. दुसरीकडे भारताचा प्रणॉय आॅल इंग्लंड चॅम्पियन शी युकी याच्याकडून पराभूत झाला. प्रणॉयने युकीच्या आव्हानाचा सामना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु तो टिकाव धरू शकला नाही. तृतीय मानांकित चीनच्या खेळाडूने दोन्ही गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेत हा सामना २१-१७, २१-१८ असा जिंकला.
पहिल्या गेममध्ये युकीने ६-३ आघाडी घेतली आणि नंतर ती ११-८ अशी वाढवली. त्यानंतर चार गुण घेत प्रणॉयला मुसंडी मारण्याची संधी न देता हा गेम जिंकला. दुसºया गेममध्ये प्रणॉय दबाव झुगारू शकला नाही.
सिंधू व बिंगजियाओ यांनी आक्रमक खेळ केला. चिनी खेळाडूने १0-८ अशी आघाडी घेतली; परंतु सिंधूने मुसंडी मारत हे अंतर ११-१0 असे केले. सिंधू आपल्या गुणांवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि बिंगजियाओने त्याचा पूर्ण फायदा घेतला. सिंधूचे एक व्हिडिओ रेफरलदेखील फेटाळले गेले. त्यानंतर बिंगजियाओने पहिला गेम जिंकला. दुसºया गेममध्ये सिंधूने ५-१ अशी आघाडी घेतली; परंतु बिंगजियाओने ६-६ अशी मुसंडी मारली व नंतर तिने १0-८ अशी आघाडी घेतली. सिंधूला लय सापडली नाही आणि तिचे स्ट्रोक्सदेखील अचूक नव्हते. तिचा शॉट नेटमध्ये गेला आणि पुन्हा अचूक परतीचा फटका मारण्यात ती अपयशी ठरली आणि त्यानंतर तिने सामना गमावला. (वृत्तसंस्था)