वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन: पी. व्ही. सिंधू जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 12:49 PM2018-12-15T12:49:22+5:302018-12-15T12:52:11+5:30

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

P. V. Sindhu enter World Tour Finals, summit clash with Nozomi Okuhara | वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन: पी. व्ही. सिंधू जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास सज्ज

वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन: पी. व्ही. सिंधू जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास सज्ज

Next
ठळक मुद्देपी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडकमाजी विश्वविजेत्या रॅटचानोक इंटानोनचा सरळ गेममध्ये पराभव जेतेपदाच्या लढतीत विश्वविजेत्या नोझोमी ओकुहाराचा सामना

ग्वांग्झू : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2018 मध्ये आत्तापर्यंत एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे 2018मधील अखेरच्या स्पर्धेत तो दुष्काळ संपवण्याचा सिंधूचा निर्धार आहे. उपांत्य फेरीत सिंधूने माजी विश्वविजेत्या रॅटचानोक इंटानोनचा सरळ गेममध्ये पराभव केला. 

 23 वर्षीय सिंधूने येथेच 2013मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिले पदक जिंकले होते. त्यानंतर तिला येथे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. उपांत्य फेरीत सिंधूने 54 मिनिटांच्या खेळात 21-16, 25-23 असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. तिला जेतेपदाच्या लढतीत 2017च्या विश्वविजेत्या नोझोमी ओकुहाराचा सामना करावा लागणार आहे. जपानच्या ओकुहाराने उपांत्य फेरीत अकाने यामागुचीवर 21-17, 21-14 असा विजय मिळवला. 



सिंधूने गटात अव्वल स्थान पटकावत आत्मविश्वास उंचावला होता. तिने ताय त्झु यिंगचा पराभव करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. इंटानोनविरुद्ध सिंधूला सात सामन्यांत 3 विजय मिळवता आले होते, त्यामुळे या लढतीत थायलंडच्या खेळाडूचे पारडे जड मानले जात होते. मात्र, सिंधूने सरस खेळ केला.

सिंधूने आक्रमक खेळ करताना पहिला गेम सहज जिंकला. दमदार स्मॅश आणि नेट जवळील कल्पक खेळ, याच्या जोरावर सिंधूने हा गेम 21-16 असा घेतला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये थायलंडच्या खेळाडूने आपला दबदबा दाखवला. 4-0 अशा पिछाडीनंतर इंटानोनने गेम 7-7 असा बरोबरीत आणला. त्यानंतर 11-10 अशी एका गुणाची आघाडी घेतली, परंतु सिंधून लढाऊ बाणा दाखवला. सामना चुरशीचा होत असताना इंटानोनचे अचानक तंत्रात बदल केला आणि सिंधूला बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडले. 

दोन्ही खेळाडूंनी हा गेम नावावर करण्यासाठी दमदार खेळ केला. मात्र, सिंधूने 25-23 अशी बाजी मारताना सामना खिशात घातला. 


Web Title: P. V. Sindhu enter World Tour Finals, summit clash with Nozomi Okuhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.