पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल दुसऱ्या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 03:20 AM2019-04-25T03:20:33+5:302019-04-25T03:21:05+5:30
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा; श्रीकांतचा पहिल्याच फेरीत पराभव
वुहान(चीन) : स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि ‘फुलराणी’ सायना नेहवाल यांनी बुधवारी संघर्षमय विजयाची नोंद करीत आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. त्याचवेळी भारताचा अव्वल पुरुष शटलर किदाम्बी श्रीकांत याला मात्र अनपेक्षित पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याने स्पर्धेतून पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला.
आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिपची रौप्य विजेती असलेल्या सिंधूने सरळ गेममध्ये जपानची ताकाहाशी सयाकावर २८ मिनिटात २१-१४, २१-७ ने वर्चस्वपूर्ण विजय संपादन केला. स्पर्धेत चौथे मानांकन लाभलगली सिंधू पुढील फेरीत इंडोनेशियाची चोईरूनिसाविरुद्ध खेळेल.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सायनाला चीनची हान युए हिला पराभूत करताचा बराच घाम गाळावा लागला. सातवे मानांकन लाभलेल्या सायनाने पहिला गेम १२-२१ असा गमविल्यानंतर जोरदार मुसंडी मारली. पुढील दोन्ही गेम सायनाने २१-११, २१-१७ अशा फरकाने जिंकले. लंडन आॅलिम्पिकची कांस्य विजेती असलेल्या सायनाला पुढील फेरीत द. कोरियाची किम गा युनविरुद्ध खेळणार आहे.
पुरुष एकेरीत समीर वर्मा याने जपानचा सकाई काजुमासा याच्यावर कडव्या संघर्षात २१-१३, १७-२१, २१-१८ ने सरश्ी साधली. तो आता हाँगकाँगचा निग लोंगविरुद्ध खेळेल. पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन आणि श्लोक रामचंद्रन हे पराभूत झाले. महिला दुहेरीत मेघना जाकामपुडी- पूर्विशा राम ही जोडी देखील थायलंडच्या प्रतिस्पर्धी जोडीकडून पारभूत होताच स्पर्धेबाहेर पडली.
किदाम्बी श्रीकांतला धक्का
किदाम्बी श्रीकांतला मात्र पराभवाचे तोेंड पहावे लागले. पुरुष एकेरीत पाचवा मानांकित असलेला श्रीकांत ४४ मिनिटांच्या संघर्षात इंडोनेशियाचा शेसार हिरेन रूस्तावितो याच्याकडून १६-२१, २०-२२ ने पराभूत झाला. इंडियन ओपननंतर उभय खेळाडूंमध्ये ही दुसरी लढत होती. दोघेही २०११ च्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यात इंडोनेशियाचा हिरेनने बाजी मारली होती.