परभणी : पाथरीत येणार नवीन दूध शीतकरण प्लॅन्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:03 AM2019-03-06T00:03:31+5:302019-03-06T00:04:37+5:30
दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून दुग्ध व्यवसाय उभा केला आहे. ३ हजार लिटर दुधाचे संकलन होणाऱ्या पाथरी येथील शासकीय दूध डेअरीवर आता २५ हजार लिटर दुधाची आवक होत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड येथील १० हजार लिटर क्षमतेचा अमोनिया चिलिंग प्लॅन्ट पाथरी येथे स्थलांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
विठ्ठल भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून दुग्ध व्यवसाय उभा केला आहे. ३ हजार लिटर दुधाचे संकलन होणाऱ्या पाथरी येथील शासकीय दूध डेअरीवर आता २५ हजार लिटर दुधाची आवक होत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड येथील १० हजार लिटर क्षमतेचा अमोनिया चिलिंग प्लॅन्ट पाथरी येथे स्थलांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
पाथरी येथे शासकीय दूध संकलन केंद्र आहे. तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांकडून संकलित होणारे दूध या संकलन केंद्रावर संकलित होऊन थंड करुन परभणी येथील शासकीय दूध डेअरीवर पाठविले जाते. पाथरी येथे दूध संकलन केंद्रावर मागील काही वर्षात केवळ ३ हजार लिटर दुधाचे संकलन होत असे. शासकीय दूध संकलन केंद्रावर त्यासाठी २ हजार लिटर क्षमतेचे शीतकरण प्लॅन्ट आहे. मात्र ५ वर्षात या भागात दूध उत्पादक संस्थांची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन दूध उत्पादन वाढले आहे. पाथरी तालुक्यात ३५ दूध संकलन संस्थांकडून आज रोजी २५ हजार लिटर दुधाचे संकलन केले जात आहे. दोन वेळा पाथरी येथील शासकीय दूध डेअरीवर दूध पुरवठा करताना या संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संकलन केंद्रावर दुधाचे शीतकरण करण्यासाठी सध्या ५ हजार लिटर क्षमतेचा प्लॅन्ट आहे. त्यामुळे या भागातून दूध शीतकरण करुन परभणीला नेण्यासाठी सुद्धा शासकीय यंत्रणेला अडचणी निर्माण झाल्याने मागील काही दिवसांत संस्थांचे मर्यादित दूध संकलन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. पर्यायाने दुष्काळी परिस्थिती असल्याने दूध उत्पादक करणाºया संस्था आणि दूध उत्पादक शेतकरी यांचे दूध खरेदी केले जात नव्हते. पाथरी तालुक्यात मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोड धंद्याकडे लक्ष दिले आहे. जायकवाडीच्या पाण्यावर बराच चारा उपलब्ध होत आहे. असे असले तरी शासकीय दूध डेअरीत सोयी नसल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला होता. पाथरी, सोनपेठ, सेलू आणि मानवत तालुक्यातील दुध उत्पादकांनी काही महिन्यांपूर्वी आ.मोहन फड यांच्याकडे राज्य शासनाकडून पाथरीत नवीन शीतकरण प्लॅन्ट बसवून देण्याची मागणी केली होती. आ. मोहन फड यांनी दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे शेतकºयांना घेऊन याबाबतचा पाठपुरावा केला. त्यानंतर १० हजार लिटर क्षमतेने अंबड येथील चालू स्थितीतील अमोनिया चिलिंग प्लॅन्ट पाथरीत स्थलांतरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
निधीही दिला उपलब्ध करुन
अंबड येथील अमोनिया शीतकरण प्लॅन्ट पाथरी येथे स्थलांतरित करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. केवळ निधीमुळे या प्लॅन्टचे स्थलांतर थांबू नये, यासाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीमार्फत प्लॅन्ट स्थलांतरित करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे १० हजार क्षमता असलेले शीतकरण प्लॅन्ट येत्या काही दिवसांत पाथरी येथे कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरु झाली आहे.
दुधातील फॅट अधिक
शासकीय नियमानुसार गायीच्या आणि म्हशीच्या दुधात अनुक्रमे ३़५ आणि ६ टक्के फॅटचे प्रमाण असणे आवश्यक आहे़ पाथरी व परिसरातील गाय व म्हशीच्या दुधातील फॅट अधिक असल्याने या दुधाला इतर ठिकाणी चांगली मागणी आहे़ त्याचा शेतकºयांना फायदा होत आहे़
पाथरी येथे १० हजार लिटर क्षमता असलेला अमोनिया शीतकरण प्लॅन्टचे मार्च महिन्याअखेरपर्यंत काम पूर्ण होऊन शेतकºयांचा प्रश्न मार्गी लागेल.
-सतीश डोईफोडे, जिल्हा दुग्ध अधिकारी