वर्षाअखेर पीबीएल खेळल्याने शरीरावर विपरीत परिणाम शक्य - सायना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 04:38 AM2018-12-22T04:38:01+5:302018-12-22T04:38:19+5:30
‘वर्षभर विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर वर्षाअखेर प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,’ असे स्पष्ट मत स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले.
मुंबई : ‘वर्षभर विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर वर्षाअखेर प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,’ असे स्पष्ट मत स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले.
सायना म्हणाली,‘प्रत्येक खेळाडू शंभर टक्के योगदान देऊन जिंकू इच्छितो. मात्र, पीबीएलचे आयोजन वर्षाअखेर होत असल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही सर्वांत कठीण स्पर्धांपैकी एक असल्याने कुठल्याही खेळाडूंसाठी या स्पर्धेत खेळणे सोपी गोष्ट नाही. पण त्याचवेळी, प्रत्येकजण या स्पर्धेत स्वत: सर्वोत्कृष्ट कामगिरी करू इच्छितो.’
नऊ संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये सायना नॉर्थ इस्ट वॉरियर्सचे नेतृत्व करणार आहे. सुपर सिरीजसारखीच कामगिरी करण्यास खेळाडू पीबीएलमध्ये इच्छुक असतात का, असा प्रश्न सायनाला विचारण्यात आला होता. यावर सायना म्हणाली,‘पीबीएल अन्य स्पर्धेसारखी नसून सांघिक स्पर्धा आहे. यात खेळणे आनंददायी असते. आमच्यासाठी हा उत्सव आहे. या स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना लाभ होतो शिवाय खेळाचा प्रचारदेखील होतो.’