प्रणय, कश्यप यांना चमकदार कामगिरीची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:58 AM2017-08-01T00:58:07+5:302017-08-01T00:58:20+5:30
यूएस ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणय आजपासून (मंगळवार) प्रारंभ होत असलेल्या न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत आपला फॉर्म कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
आॅकलंड : यूएस ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणय आजपासून (मंगळवार) प्रारंभ होत असलेल्या न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत आपला फॉर्म कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
कारकिर्दीत दुखापतींसोबत संघर्ष करणाºया प्रणयने एक वर्ष चार महिन्यांपासून जेतेपदाचा दुष्काळ संपविताना गेल्या वर्षी मार्च महिन्यात स्विस ओपनचे जेतेपद पटकावले होते. यूएस ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानी दाखल झालेल्या प्रणयला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
यूएस ओपनची अंतिम फेरी गाठणारा कश्यप कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. राष्ट्रकुल चॅम्पियन कश्यपने क्रमवारीत १२ स्थानांची प्रगती करताना ४७ वे स्थान गाठले आहे. त्याला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या जियोनिसियस हेयोम आरसोबत लढत द्यावी लागेल.
पुढील महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत असलेल्या अजय जयरामला पहिल्या फेरीत चिनी ताइपेच्या चिया हुंग लूच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी चीन ताइपे ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकावणारा माजी राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा आॅस्ट्रेलियाच्या नाथन तांगसोबत खेळेल. युवा सिरिल वर्माला इंडोनेशियाच्या रियांतो सुबाजाविरुद्ध तर प्रतुल जोशी याला स्थानिक खेळाडू डॅक्सोन वोंगविरुद्ध लढत द्यावी लागेल. (वृत्तसंस्था)