प्रणॉय, कश्यप यांची विजयी घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:27 AM2017-08-03T01:27:57+5:302017-08-03T01:27:59+5:30
एच. एस. प्रणॉय आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय खेळाडूंनी आपली विजयी आगेकूच कायम राखताना न्यूझीलंड ग्रां. प्री. स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली.
आॅकलंड : एच. एस. प्रणॉय आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय खेळाडूंनी आपली विजयी आगेकूच कायम राखताना न्यूझीलंड ग्रां. प्री. स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. दोघांनीही आपआपल्या सामन्यात सरळ दोन गेममध्ये बाजी मारत शानदार विजय मिळवले.
गत महिन्यात कॅलिफोर्निया येथे यूएस ओपन जिंकलेल्या प्रणॉयने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना इंडोनेशियाच्या फिरमान अब्दुल खोलिक याचे कडवे आव्हान २३-२१, २१-१८ असे परतवले. दुसºया गेममध्ये प्रणॉयने चांगली पकड मिळवत सामना जिंकला. पुढील फेरीत प्रणॉयचा सामना हाँगकाँगचा १०वा मानांकित वेई नानविरुद्ध होईल.
दुसरीकडे, राष्ट्रकुल चॅम्पियन पी. कश्यपने अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या आॅस्कर गुओचा २१-९, २१-८ असा फडशा पाडला. सुरुवातीलापासून आक्रमक पवित्रा घेतलेल्या कश्यपने एकहाती दबदबा राखताना आॅस्करला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. आता, पुढील फेरीत कश्यपपुढे देशबांधव आणि ७ वे मानांकन असलेल्या सौरभ वर्माचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)
महिलांमध्ये संयोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत यांना दुहेरीमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. जपानच्या चौथ्या मानांकित अयाको साकुरमातो - युकिको ताकाहाटा या जोडीने घोरपडे-सावंत यांना २१-१५, २१-१८ असा धक्का दिला. मिश्र दुहेरी गटात फान कियुयुए - जुआनजुआन लियु यांनी २१-१३, २१-१३ असा सहज विजय मिळवताना भारताच्या प्राजक्ता आणि मलेशियाच्या योगेंद्रन कृष्णन यांना पराभूत केले.
अन्य सामन्यात युवा साहिल सिपानी आणि नीरज विशिष्ट यांना आपला गाशा गुंडाळावा लागला. चिनी तैपईच्या ११व्या मानांकित लिन यू सिएन याने साहिलचा २१-९, २१-८ असा पाडाव केला. तसेच, आॅस्टेÑलियाच्या अँथोनी जो विरुद्ध नीरजला १६-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला.