रुद्रा राणेचे रौप्य, तर रोहन थूलचे कांस्य पदकावर समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:22 AM2020-01-08T04:22:03+5:302020-01-08T04:22:14+5:30
राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक जेतेपद पटकावलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून वैयक्तिक गटातही मोठी अपेक्षा होती.
अहमदनगर : राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक जेतेपद पटकावलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून वैयक्तिक गटातही मोठी अपेक्षा होती़ मात्र, दडपणाखाली महाराष्ट्राच्या रुद्रा राणेला रौप्य व रोहन थूलला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले़ मुलांमध्ये केरळच्या एऩ पी़ उदिथ व दिल्लीच्या लिखिता श्रीवास्तव यांनी सुवर्ण कामगिरी केली़
३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचा मंगळवारी समारोप झाला़ मुलांच्या अंतिम फेरीत केरळच्या एऩ पी़ उदिथ याने सरळ दोन गेममध्ये बाजी मारताना दिल्लीचा शौर्य सिंग याचा २१-१७, २२-२० असा पराभव केला. आक्रमक स्मॅशच्या जोरावर उदिथने सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याआधी उदिथने महाराष्ट्राच्या रोहन थूलचा चुरशीच्या सामन्यात २-१ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. दुसरीकडे, शौर्यने बिगरमानांकित रनिष्क सक्सेनाचा २-१ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यानंतरच्या लढतीत रोहनने तनिष्कला सहज नमवत कांस्य पदकावर नाव कोरले.
मुलींमध्ये दिल्लीच्या लिखिताने यजमान महाराष्ट्राच्या रुद्रा राणेचा २१-१७, २३-२१ असा पराभव करुन सुवर्ण यश मिळवले. यावेळी रुद्राला घरच्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळाला.
टाळ्या, शिट्टयांसह रुद्राच्या नावाचा जयघोष करत प्रेक्षकांनी रुद्राचा उत्साह उंचवण्याचा प्रयत्न केला. मात्र लिखिताने संयमी खेळ करताना सामन्यावरील आपली पकड अखेपर्यंत सोडली नाही. त्याआधी रुद्राने महाराष्ट्राच्याच देविका कांबळेचा सरळ गेममध्ये, तर दिल्लीकरांमध्येच झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात लिखिता श्रीवास्तवने दमदार खेळाच्या जोरावर दुर्वा गुप्ताला धक्का देत दिमाखात अंतिम फेरी गाठली़
>महाराष्ट्राचे सांघिक विजेतेपद
रविवारी महाराष्ट्राच्या मुलांनी कर्नाटकवर मात करीत सांघिक विजेतेपद पटकावले़ मुलींमध्ये दिल्लीच्या डीएव्ही कॉलेज संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले़ सुवर्णपदक पटकावणाºया महाराष्ट्राकडून रोहन थूल (ठाणे), शंतनू पवार (नाशिक), तनिष्क सक्सेना (मुंबई) यांनी, तर दिल्लीकडून दीपशिखा सिंग, लिखिता श्रीवास्तव यांनी लक्षवेधक खेळ केला़
रोहन ठरला सर्वोत्तम : मुलांमध्ये उदिथ, तर मुलींमध्ये लिखिता उत्कृष्ट खेळाडू ठरले. महाराष्ट्राच्या रोहन थूलला सर्वोत्तम खेळाडूने गौरविण्यात आले.