रशियन ओपन बॅडमिंटन : सौरभ, कुहू-रोहन अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 05:23 AM2018-07-29T05:23:50+5:302018-07-29T05:24:05+5:30
माजी राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा याने शनिवारी येथे सुरू असलेल्या ७५००० डॉलर पारितोषिक रकमेच्या रशियन ओपन टूर सुपर-१०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली.
ब्लादिवोस्तव (रशिया) : माजी राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा याने शनिवारी येथे सुरू असलेल्या ७५००० डॉलर पारितोषिक रकमेच्या रशियन ओपन टूर सुपर-१०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. २५ वर्षांच्या सौरभने आपलाच सहकारी मिथुन मंजुनाथ याच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदविला. अंतिम फेरीत सौरभची गाठ जपानच्या कोकी वाटांबेशी पडणार आहे.
जखमेतून सावरलेल्या सौरभने उपांत्य फेरीत केवळ ३१ मिनिटांत
२१-९,२१-१५ने मिथुनवर मात केली. चीन तैपेई मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या सौरभने आजच्या सामन्यातही आपला वरचष्मा कायम राखला. दोन्ही सेट्समध्ये सौरभकडे
६ गुणांची भक्कम आघाडी होती. दुस-या सेटमध्ये मिथुनने पुनरागमन करत सौरभला धक्का दिला. मात्र तिसºया सेटमध्ये अनुभव पणाला लावत सौरभने सामन्यात बाजी मारली.
कुहू गर्ग-रोहन कपूर या मिश्र जोडीने शानदार फॉर्म कायम राखून अंतिम फेरीत धडक दिली आहे. चेन टांग जी आणि येन वेई पॅक या दुस-या मानांकित मलेशियाच्या जोडीवर त्यांनी ५८ मिनिटांत २१-१९,११-२१,२२-२० असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला. या जोडीला आता यजमान जोडी ब्लादिमीर इवानोव- मिन क्यूंग किम यांच्याविरुद्ध लढत द्यावी लागेल.
दुसरीकडे भारताच्या पुरुष दुहेरी जोडीला मात्र उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अरुण जॉर्ज-संयम शुक्ला यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाचा धक्का बसला. त्यांना कॉन्स्टेनटाईन अबरामोव- अलेक्झांडर जिनचेंको या दुसºया मानांकित जोडीने २१-१५,२१-१९ अशा फरकाने पराभूत केले. (वृत्तसंस्था)