सायना इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 01:15 AM2019-01-27T01:15:55+5:302019-01-27T01:16:16+5:30
सायनाने गेल्या वर्षीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
जकार्ता : सायना नेहवालने शानदार फॉर्म कायम राखताना चीनच्या ही विंगजियाओचा पराभव करीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सायनाने गेल्या वर्षीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तिने सहाव्या मानांकित बिंगजियाओची झुंज १८-२१, २१-१२, २१-१८ ने मोडून काढली. सायनाला अंतिम फेरीत तीनवेळची विश्वचॅम्पियन व ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिन किंवा चीनच्या चेन युफेई यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
सायनाने गेल्या वर्षीय राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, आशियन गेम्समध्ये कांस्य आणि डेन्मार्क, इंडोनेशिया मास्टर्स व सैयद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. सायना सुरुवातीला ०-२ ने पिछाडीवर होती, पण काही चांगले फटके लगावत तिने ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सायनाने ८-६ अशी आघाडी घेतली, पण बिंगजियाओने ब्रेकनंतर पुनरागमन करताना १७-१८ असा स्कोअर केला. सायनाचा फटका कोर्टबाहेर गेल्यामुळे बिंगजियाओने पहिला सेट २१-१८ ने जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सायनाने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या चुकीचा लाभ घेत सुरुवातीलाच ११-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर बिंगजियाओने सलग चार गुण वसूल केले. सायनाने क्रॉसकोर्टवर शानदार रिटर्नच्या मदतीने १७-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर चार गुण वसूल करील दुसरा गेम जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. अखेरच्या गेममध्ये सायनाने कामगिरीत सातत्य राखताना बिंगजियाओला कुठली संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)