समोर सायना असल्यामुळे अंतिम फेरीचा सामना सोपा नव्हता - पी.व्ही.सिंधू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 06:25 PM2017-11-09T18:25:16+5:302017-11-09T18:30:31+5:30
बॅडमिंटनमध्ये रँकिंग अव्वल आहे म्हणून तुम्ही तो सामना सहज जिंकाल असा विचार करुन चालत नाही.
नवी दिल्ली - बॅडमिंटनमध्ये रँकिंग अव्वल आहे म्हणून तुम्ही तो सामना सहज जिंकाल असा विचार करुन चालत नाही. जिंकण्यासाठी तुम्हाला सामन्यावर लक्ष केंद्रीत करावे लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे अतिआत्मविश्वास बाळगू नये असे मत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू आणि जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या पी.व्ही.सिंधूने व्यक्त केले. 82 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फुलराणी सायना नेहवालने अंतिम फेरीत सिंधूवर मात केली.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सिंधू म्हणाली की, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यंदा सर्व टॉप खेळाडू सहभागी होणार होते. ही महत्वाची स्पर्धा होती. मी माझा नैसर्गिक खेळ केला. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर समोर सायना नेहवाल असल्यामुळे हा सामना माझ्यासाठी सोपा नसणार याची कल्पना होती. चांगला सामना झाला. मला जिंकायला आवडले असते पण शेवटी जय-पराजय खेळाचा एक भाग आहे असे सिंधू म्हणाली.
महिला बॅडमिंटन आता भरपूर स्पर्धात्मक बनले आहे. टॉप 20 मध्ये असलेल्या बॅडमिंटनपटूंमध्ये थोडाबहुत फरक असला तरी क्षमता एकसमानच आहे. दोन खेळाडू एकसारखे असू शकत नाही. प्रत्येकाची खेळण्याची शैली, फटक्यांची क्षमता यामध्ये फरक असतो. प्रत्येक खेळाडूला वेगवेगळे डावपेच लागू पडतात असे सिंधूने सांगितले.
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर अपेक्षांचे ओझे वाढले असे तुला वाटले का ? या प्रश्नावर सिंधू म्हणाली कि, आपल्या सर्वांच्या आयुष्यात लक्ष्य असते. लक्ष्य निश्चित केल्यानंतर ते गाठणे सोपे नसते. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. तुम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मला कधीच अपेक्षांचे ओझे जाणवले नाही. मी भरपूर काही मिळवले आहे. पण माझ्यासाठी ही एक सुरुवात आहे. अजून भरपूर काही मिळवायचे आहे असे सिंधूने सांगितले.
सायनाने मिळवला विजय
सहा हजारांवर प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत बुधवारी कोराडी मार्गावरील मानकापूर संकुलात खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात २८ वर्षीय सायनाने २१ वर्षीय सिंधूला ५३ मिनिटांत २१-१७, २७-२५ ने पराभूत करीत २००७ नंतर तिसरे राष्ट्रीय विजेतेपद संपादन केले.
सायना- सिंधू सामन्याबद्दल प्रचंड उत्कंठा होती. उभय खेळाडूंनी रोमहर्षक खेळ करीत चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दोघीही प्रत्येक गुणासाठी अक्षरश: झुंजल्या. सायनाने आक्रमक सुरुवात करीत चुका टाळल्या. त्याचा लाभ तिला पहिला गेम २१-१७ असा जिंकण्यात झाला.
दुस-या गेममध्ये मात्र सिंधूने सकारात्मक सुरुवात करीत प्रारंभी ५-१ अशी आघाडी मिळविली. पण सायनाने पिछाडी भरून काढून ६-६ अशी बरोबरी साधली. सिंधू जेव्हा १८-१४ अशी विजयाकडे वाटचाल करीत होती तोच सायनाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सलग चार गुणांसह पुन्हा एकदा १८-१८ अशी बरोबरी केली. यानंतर गुणांचा थरार सुरू झाला. सायना पाच वेळा गेम आणि सामना जिंकण्याच्या स्थितीत आली असताना सिंधूने मुसंडी मारून संघर्ष केला. अखेर लढत २६-२५ अशी काठावर आली तोच सायनाने मारलेला शॉट सिंधूकडून परत न येता नेटमध्ये अडकताच सायनाचा सनसनाटी विजय साकार झाला.