पूर्ण तंदुरुस्तीसाठी पुरेशा वेळेची गरज : सायना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:20 AM2018-01-01T03:20:32+5:302018-01-01T03:20:43+5:30
सांध्याच्या दुखापतीतून सावरणारी भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने पुढील महिन्यात इंडिया ओपननंतर तीन आठवड्यांच्या ब्रेकदरम्यान पूर्ण तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली : सांध्याच्या दुखापतीतून सावरणारी भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने पुढील महिन्यात इंडिया ओपननंतर तीन आठवड्यांच्या ब्रेकदरम्यान पूर्ण तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
सायना म्हणाली, ‘‘मला या स्पर्धेआधी सांध्याला दुखापत झाली. त्यामुळे मी तीन आठवड्यांनंतर सामना खेळत होती. सांध्यावर सूज होती. सकाळी जेव्हा मी सराव करीत होते तेव्हा थोडा त्रास होत होता. सांध्याची दुखापत कठीण असते. कारण यावरच आपल्या हालचाली अवलंबून असतात. मला आता इंडिया ओपननंतर दोन ते तीन आठवडे असा पुरेसा वेळ मिळेल. विश्व चॅम्पियनशिपनंतर मी गोपीसर यांच्याकडे सरावास गेले तेव्हा माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यावेळेस जास्त स्पर्धा होती आणि त्याचवेळेस दुखापत झाली. आता मला अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळण्यासाठी सर्वोत्तम फिटनेसची आवश्यकता आहे.’’
लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेल्या सायनाने आपण सराव करीत आहोत; परंतु खेळताना स्वत:ला मजबूत ठेवावे लागेल, असे सांगितले. शनिवारी रात्री पीबीएलमध्ये मिशेल लीविरुद्ध सायानाने पिछाडीवरुन बाजी मारली.