सायना नेहवालच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, फुलराणी रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:21 PM2019-03-14T12:21:08+5:302019-03-14T12:21:21+5:30
ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या सायना नेहवालला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हैदराबाद : नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या सायना नेहवालला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखत असूनही ती ऑल इंग्लंड स्पर्धा खेळली, पण तिचे हे दुखणे वाढले आहे आणि त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुखण्यामुळे तिला आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
तिने सोशल मीडियावर याबाबत लिहिले की,''तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. सोमवारपासून माझ्या पोटात वेदना होत होत्या, पण तरिही मी ऑल इंग्लंड स्पर्धेत काही सामने खेळले. पण, आता या वेदना असह्य झाल्यामुळे आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घेत आहे. डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. आशा करते की लवकरच कोर्टवर परतेन.''
So some sad news .. was really going through acute stomach pain from last Monday.. managed to play few matches in All England with lot of pain ... and decided to skip swiss open and come back to India and find out the issue and I found out it’s https://t.co/bylJ01B4CE
— Saina Nehwal (@NSaina) March 13, 2019
सायनाला शुक्रवारी ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या तैवानच्या ताय त्झु यिंगकडून हार मानावी लागली. सायनाला सलग 13व्या सामन्यात तैवानच्या खेळाडूकडून हार मानावी लागली. ताय ज्यू ने ३७ मिनिटांत १५-२१, १९-२१ ने पराभूत केले. उभय खेळाडूंमध्ये झालेल्या २० पैकी केवळ पाच सामन्यांत सायनाने बाजी मारली आहे.
सायनावर तिने पहिल्या गेममध्ये ११-३ अशी आघाडी घेतली होती. नंतर सायनाने १२ पैकी नऊ गुण संपादन करीत १४-१२ अशी पिछाडी भरून काढली. ताय ज्यू ने आघाडी वाढवून २०-१३ अशी केली व पाठोपाठ गेम जिंकला. प्रतिस्पर्धी खेळाडूची दमदार कामगिरी दुसऱ्या गेममध्येही कायम राहिली. तिने ११-८ अशी प्रारंभी आघाडी मिळविली होती. सायनानेदेखील प्रतिकार केल्यामुळे गुणफलक १७-१५ आणि थोड्याच वेळात १९-१९ असा झाला. ताय ज्यू ने सलग दोन गुणांची कमाई करीत गेम आणि सामना जिंकला.
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सायनानं भारताला अनेक अविश्वसनीय जेतेपद जिंकून दिली. 2018 मध्ये तीने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकाची कमाई केली. तिने महिला एकेरी व मिश्र दुहेरी गटात बाजी मारली. शिवाय आशियाई स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने दोन कांस्यपदक जिंकले.