समीर, सायना आणि कश्यप उपांत्यपूर्व फेरीत; सात्विक-अश्विनी यांची विजयी आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 01:15 AM2018-11-23T01:15:19+5:302018-11-23T01:15:31+5:30
समीर वर्मा, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय स्टार शटलर्सनी गुरूवारी येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विश्व सुपर टूर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
लखनऊ : समीर वर्मा, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय स्टार शटलर्सनी गुरूवारी येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विश्व सुपर टूर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
तीन वेळीची विजेती आणि दुसरी मानांकित खेळाडू सायनाने भारताच्याच युवा अमोलिका सिंह सिसौदियला २१-१४, २१-९ ने पराभूत केले. दुसरीकडे, २०१२ आणि २०१५ चा विजेता कश्यप याने पहिला गेम गमावल्यानंतर पुनरागमन करताना इंडोनेशियाच्या फिरमान अब्दूल खोलिक याचे आव्हान ९-२१, २२-२०, २१-८ असे संपुष्टात आणले.
तिसऱ्या मानांकित समीर याने चीनच्या झाओ जुनपेंग याला २२-२०, २१-१७ असे पराभूत केले. आता पुढील फेरीत त्याचा सामना चीनच्या झोऊ जेकीविरुद्ध होईल. सायनाला पुढील लढतीमध्ये भारताच्याच रितुपर्णा दासविरुद्ध खेळेल. दासने श्रृती मुंदडाला २१-११, २१-१५ असे नमवले. कश्यप आठव्या मानांकित सिटीकोम थामिसनविरुद्ध लढेल.
चौथ्या मानांकित बी. साई प्रणितने इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोला २१-१२, २१-१० असे पराभूत केले. तो आता चीनच्या लु ग्वांझूसोबत भिडेल. ग्वांझूने शुभंकर डे याला २१-१२, २१-१५ ने पराभूत केले.
सात्विक-अश्विनी यांची विजयी आगेकूच
महिला एकेरीच्या अन्य सामन्यात साई उत्तेजिका राव चुक्काने रेश्मा कार्तिकला २१-१२, २१-१५ ने पराभूत केले. तिचा सामना आता माजी आॅलिम्पिक विजेती ली झुरेईसोबत होईल. त्याचप्रमाणे, सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि अश्विनी पोनाप्पा यांच्या जोडीने अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मिश्र दुहेरीत शिवम शर्मा आणि पुर्विशा एस राम ला १२-२१, २१-१४, २१-१५ असे नमवत आगेकूच केली.