सायना, समीर स्विस ओपनसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:04 AM2019-03-12T04:04:29+5:302019-03-12T04:05:36+5:30
ऑल इंग्लंड स्पर्धेतील अपयश विसरुन सकारात्मक कामगिरीचा विश्वास
बासेल : दोनदा जेतेपदाची मानकरी ठरलेली सायना नेहवाल आणि गत विजेता समीर वर्मा ऑल इंग्लंडची निराशा विसरून मंगळवारपासून सुरु होत असलेल्या स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत छाप सोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
समीरने गेल्या वर्षी या स्पर्धेसह आपल्या शानदार मोहिमेची सुरुवात केली होती आणि त्यानंतर तो विश्व टूर फायनल्समध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला होता. त्याचसोबत त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ११ वे मानांकनही मिळवले होते. जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या समीरला या स्पर्धेत पहिल्या फेरीत क्लालिफायरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. समीरला त्याचा मोठा भाऊ सौरभसोबत खेळायचे होते, पण दुखापतीमुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. समीरला दुसऱ्या फेरीत मायदेशातील सहकारी बी. साई प्रणितच्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. जर त्याने या लढतीत विजय मिळवला तर त्याला जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू व्हिक्टर एक्सेलसेनसोबत हिशेब चुकता करण्याची संधी मिळू शकते. गेल्या आठवड्यात आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये एक्सेलसेनने समीरला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळण्यास भाग पाडले होते.
बर्मिंगहॅममध्ये आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये डायरियामुळे सायनाची कामगिरी प्रभावित झाली होती. ती त्यातून सावरली असून आपल्या मोहिमेची सुरुवात क्वालिफायरविरुद्धच्या लढतीने करणार आहे. यापूर्वी २०११ व २०१२ मध्ये सायनाने येथे जेतेपद पटकावले आहे. तिसऱ्या मानांकित सायनाची नजर येथे तिसरे जेतेपद पटकावण्यावर केंद्रित झाली आहे.
पुरुष एकेरीत राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी चॅम्पियन पारुपल्ली कश्यपला पहिल्या फेरीत क्वालिफायरविरुद्ध खेळावे लागेल, तर प्रणितची लढत इंग्लंडच्या राजीव ओसेफविरुद्ध होईल. शुभंकर डेला पहिल्या फेरीत क्वालिफायरच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
महिला एकेरीत सायनाव्यतिरिक्त केवळ वैष्णवी जक्का रेड्डी कोर्टवर आहे. तिला पहिल्या फेरीत एस्टोनियाच्या क्रिस्टिना कुबाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
पुरुष दुहेरीत अर्जुन एमआर व रामचंद्र श्लोक आणि मनू अत्री व बी. सुमित रेड्डी भारताचे आव्हान सांभाळतील तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी आणि पूजा व संजना संतोष यांच्या कामगिरीवर नजर राहील.
मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा व सिक्की यांच्या व्यतिरिक्त अर्जुन एम.आर. आणि मीनाक्षी आणि ध्रुव कपिला व कहू गर्ग भारताचे प्रतिनिधित्व करतील. क्लालिफायरमध्ये रिया मुखर्जी व रुषाली गुम्मादी सहभागी होत आहेत.