सायना, श्रीकांत यांची क्रमवारीमध्ये आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 03:32 AM2017-09-02T03:32:12+5:302017-09-02T03:32:14+5:30
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर सायना नेहवालला नव्याने जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत फायदा झाला आहे.
नवी दिल्ली : जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर सायना नेहवालला नव्याने जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत फायदा झाला आहे. यानुसार तिने चार स्थानांची झेप घेत १२वे स्थान पटकावले आहे. पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांतलाही दोन स्थानांचा फायदा झाला आहे.
सायना याआधी १६व्या स्थानावर घसरली होती. परंतु, जागतिक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतर ती पुन्हा एकदा अव्वल दहामध्ये स्थान पटकावण्याच्या जवळ आली आहे. त्याचवेळी, सिंधूने आपले चौथे स्थान कायम राखले आहे.
पुरुष क्रमवारीत जागतिक स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत पोहचलेला श्रीकांत आठव्या स्थानी पोहचला आहे. अजय जयराम व बी. साई प्रणीत अनुक्रमे १६ आणि १७व्या स्थानी पोहचले आहेत. एचएस प्रणयला तीन स्थानांचा फटका बसला असून तो १८व्या स्थानी घसरला आहे.