सर्व्हिसचा नवा नियम पारदर्शक नाही- एच. एस. प्रणॉय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 10:02 PM2018-03-28T22:02:23+5:302018-03-28T22:02:23+5:30
जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आणलेल्या सर्व्हिसच्या नवीन नियमांविरुद्ध खेळाडू काही करू शकत नाहीत. त्यांना त्याप्रमाणे खेळावेच लागेल. या निर्णयानुसार अद्याप माझ्या सर्व्हिसमध्ये कोणतीही चूक समोर आलेली नसली, तरी सर्व्हिस फॉल्ट ठरविणे हे प्रत्येक पंचाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे.
- रोहित नाईक
मुंबई : जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आणलेल्या सर्व्हिसच्या नवीन नियमांविरुद्ध खेळाडू काही करू शकत नाहीत. त्यांना त्याप्रमाणे खेळावेच लागेल. या निर्णयानुसार अद्याप माझ्या सर्व्हिसमध्ये कोणतीही चूक समोर आलेली नसली, तरी सर्व्हिस फॉल्ट ठरविणे हे प्रत्येक पंचाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. हा नियम पारदर्शक नसल्याने येत्या काही काळात हा नियम रद्द केला, तर नक्कीच याचा फायदा खेळाडूंना होईल, असे मत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने लोकमतकडे व्यक्त केले.
४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रणॉयने कंबर कसली असून, या निमित्ताने त्याने लोकमतशी विशेष संवाद साधला. जागतिक बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसच्या बदललेल्या नियमांचा फटका काही दिवसांपूर्वीच भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतला बसला होता. यामुळे प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड स्पर्धेतून त्याला अनपेक्षितपणे आपला गाशा गुंडाळावा लागला होता. याविषयी विचारले असता, प्रणॉय म्हणाला की, नवीन नियम अंमलात आणल्यापासून माझ्या सर्व्हिसमध्ये एकदाही दोष आढळला नाही. नव्या नियमानुसार सर्व्हिस चुकीचे ठरविणे हे पूर्णपणे पंचांच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
प्रत्येक पंच या नियमाकडे आपल्या परीने पाहात असल्याने, या नियमात पारदर्शीपणा नाही आणि त्याचा फटका खेळाडूंना बसतो. असे असले, तरी बीडब्ल्यूएफच्या नियमांविरुद्ध आम्ही काहीही करू शकत नाही. आम्हाला नव्या नियमांप्रमाणे तडजोड करून खेळावेच लागते. कदाचित, पुढील २-३ महिन्यांमध्ये हा नियम रद्द करण्यात आला, तर निश्चित याचा खेळाडूंना फायदा होईल.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीबाबत प्रणॉय म्हणाला की, आॅल इंग्लंड स्पर्धेनंतर राष्ट्रकुलसाठी तयारी करण्यास आम्हाला १० दिवस मिळाले. या कालावाधीमध्ये खेळामध्ये फार काही बदल करता आला नाही, पण तरीही चांगली तयारी झाली आहे. २-३ दिवसांत आम्ही गोल्डकोस्टला जाऊ. एकूणच सध्या आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आता आम्हाला केवळ गोल्ड कोस्ट येथील परिस्थितींशी जुळवून घ्यायचे आहे.
नुकताच झालेल्या आॅल इंग्लंड स्पर्धेत प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती.
याविषयी तो म्हणाला की, यंदाच्या आॅल इंग्लंड स्पर्धेत माझी कामगिरी चांगली झाली. या स्पर्धेतील अनुभवाचा खूप फायदा होईल. पहिले सामने जिंकणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. यामुळे मला माझा खेळ आणखी उंचावता आला. एकूणच या स्पर्धेमुळे आत्मविश्वास खूप उंचावला असून, राष्ट्रकुल आणि त्यानंतर आशियाई स्पर्धेत याचा नक्कीच फायदा होईल.
---------------------------
भारतीय संघ कागदावर खूप मजबूत दिसत आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत यांच्यासह दुहेरीतही भारतीय चांगले खेळत आहेत. सांघिक गटामध्ये भारताला पदक जिंकण्याची खूप चांगली संधी आहे. सांघिक गटात भारत सुवर्ण जिंकेल, अशी आशा आहे.
- एच. एस. प्रणॉय