श्रीकांत, सौरभ यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 04:19 AM2019-11-29T04:19:06+5:302019-11-29T04:19:48+5:30
माजी विजेता किदाम्बी श्रीकांत व सौरभ वर्मा यांनी गुरुवारी येथे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी युवा खेळाडू लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का बसला.
लखनौ : माजी विजेता किदाम्बी श्रीकांत व सौरभ वर्मा यांनी गुरुवारी येथे सय्यद मोदी आंतरराष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी युवा खेळाडू लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का बसला.
श्रीकांतने भारताच्याच पारुपली कश्यपला १८-२१, २२-२०, २१-१६ असे पराभूत केले. त्याचा सामना आता कोरियाच्या सोन वान हो याच्याशी होणार आहे. तींन गेमपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात कश्यपने दमदार सुरुवात करत श्रीकांतला दडपणाखाली ठेवले. त्याने पहिला गेम जिंकत सामन्यात वर्चस्वही राखले. मात्र श्रीकांतने यानंतर मोक्याच्या वेळी खेळ उंचावत सलग दोन गेम जिंकताना कश्यपचा पराभव केला. श्रीकांतचे निर्णायक स्मॅश आणि नेटजवळील चपळ खेळ यापुढे कश्यपचा निभाव लागला नाही. सौरभ वर्माने अलाप मिश्रा याला २१-११, २१-१८ असे पराभूत केले. त्याचा सामना थायलंडच्या कुनालवत वितिदसार्न याच्याशी होणार आहे.
दुसरीकडे, थायलंडच्या कुनालवत वितिदसार्न याने बी. साई प्रणीतचा २१-११, २१-१७ असा अनपेक्षित पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुढील सामन्यात तो भारताच्या सौरभ वर्माविरुद्ध खेळेल. भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनला अनुभवी सोन वान याच्याकडून २१-१४, २१-१७ असे पराभूत व्हावे लागले. अजय जयरामयाला चीनच्या झाओ जुन पेंगे याने तीन गेममध्ये १८-२१, २१-१४, २८-३० असे नमविले. सिरिल वर्माचाही हियो कवांगकडून २१-९, २४-२२ असा पराभव झाला.
महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांनी इंग्लंडच्या चोले बिर्च-लॉरेन स्मिथ यांच्याविरुद्ध पहिल्या गेमनंतर माघार घेतली. पायाचे स्नायू दुखावल्याने अश्विनीला खेळण्यास अडचण आली. तसेच, सिमरन सिंघी-रितिका ठाकर यांनी रिया मुखर्जी-अनुरा प्रभुदेसाई यांचा २१-१२,२१-१५ असा पराभव केला.