सिंधू, सायना यांची दुसऱ्या फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 07:09 AM2019-04-11T07:09:21+5:302019-04-11T07:09:24+5:30
स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी महिला एकेरीत आपापले सलामीचे सामने जिंकून बुधवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
सिंगापूर : स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी महिला एकेरीत आपापले सलामीचे सामने जिंकून बुधवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
चौथ्या मानांकित सिंधू हिने महिला एकेरीत एकतर्फी लढतीत इंडोनेशियाची लेनी अलेसांद्रा मैनाकी हिचा केवळ २७ मिनिटात २१-९,२१-७ ने पराभव केला. रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती सिंधूची पुढील लढत डेन्मार्कची मिया ब्लिचफेल्ट हिच्याविरुद्ध होईल.
सहावी मानांकित सायनाने इंडोनेशियाची यूलिया योसोफिन सुसांतो हिचे आव्हान २१-१६, २१-११ असे परतवून लावले. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकची रौप्य विजेती सायनाला पुढील लढतीत सहकारी मुग्धा आग्रे आणि थायलंडची पोर्नपावी चोचुवोंग यांच्यातील विजेत्या खेळाडूविरुद्ध खेळावे लागणार आहे.
पुरुष दुहेरीत मात्र पहिल्याच फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. मनू अत्री-बी. सुमित रेड्डी यांची जोडी पहिल्या फेरीत सिंगापूरची नवखी जोडी डॅनी बाव-कीन हीन यांच्याकडून १३-२१, १७-२१ ने पराभूत झाली. सौरभ शर्मा-अनुष्का पारिख ही मिश्र जोडीदेखील थायलंडच्या जोडीकडून पराभूत झाली. प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी यांच्या जोडीने मात्र मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीने सहकारी अर्जुन एम. आर-के. मनीषा यांच्यावर २१-१८,२१-७ ने विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)
श्रीकांतचाही विजयी श्रीगणेशा
मागच्या महिन्यात इंडिया ओपनचे उपविजेता ठरलेल्या किदाम्बी श्रीकांतनेही सकारात्मक सुरुवात करत दुसरी फेरी गाठली. एकतर्फी झालेल्या लढतीत श्रीकांतने केवळ ४१ मिनिटांमध्ये बाजी मारताना थायलंडच्या सिटहीकोम थामासिन याचा २१-१४, २१-१८ असा पराभव केला. अन्य लढतीत पारुपल्ली कश्यप यानेही विजयी सलामी देताना जागतिक क्रमवारीत २८व्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या रासमस गेमके याला २१-१९, २१-१४ असे नमविले. समीर वर्माने आपल्या पहिल्या लढतीत थायलंडच्या सुपान्यु अविंहिगसानोन याचा २१-१४, २१-१६ असा पाडाव केला. तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत बाजी मारताना एच. एस. प्रणॉयने फ्रान्सच्या ब्राइस लेवरडेज याचे कडवे आव्हान ११-२१, २१-१६, २१-१८ असे परतावले.