सिंधू, श्रीकांतही फ्रेंच ओपनमधून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 10:54 PM2018-10-27T22:54:12+5:302018-10-27T22:55:01+5:30
पराभवामुळे एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात
पॅरिस : आॅलिम्पिक रौप्यविजेती स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडले. या पराभवासह एकेरीतील भारताचे आव्हानदेखील संपुष्टात आले.
तिसरी मानांकित सिंधूला चीनची सातवी मानांकितही बिगजियाओने २१-१३,२१-१६ ने पराभूत केले. यंदा चीनच्या या खेळाडूकडून सिंधूचा सलग दुसरा पराभव ठरला. याआधी जुलैमध्ये इंडोनेशिया ओपनमध्ये बिगजियाओने सिंधूला धूळ चारली होती. विजयासह सिंधूविरुद्ध तिचा रेकॉर्ड ७-५ असा झाला. याआधी सायना नेहवालला चायनीज तायपेईची ताय झू यिम हिने उपांत्यपूर्व सामन्यात २२-२०, २१-११ अशा फरकाने धूळ चारली होती.
पाचवा मानांकित के. श्रीकांत हा जपानचा केंतो मोमोता याच्याकडून १६-२१,१९-२१ ने पराभूत झाला. यंदा श्रीकांतचा केंतोकडून सलग पाचवा तसेच एकूण सातवा पराभव ठरला. मागच्या आठवड्यात डेन्मार्क ओपनच्या उपांत्य सामन्यात श्रीकांत मोमोताकडून पराभूत झाला होता.
पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज-चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत धडक दिली. त्यांनी आपलेच सहकारी मनू अत्री-बी. सुमित रेड्डी यांच्यावर २१-१७,२१-११ ने सरळ गेममध्ये विजय साजरा केला. (वृत्तसंस्था)