सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:27 AM2018-03-16T01:27:12+5:302018-03-16T01:27:12+5:30
आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त भारताच्या पी.व्ही. सिंधू हिने थायलंडच्या निश्चोन जिंडापोल हिच्यावर मात करीत आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली.
बर्मिंगहॅम : आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त भारताच्या पी.व्ही. सिंधू हिने थायलंडच्या निश्चोन जिंडापोल हिच्यावर मात करीत आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाºया सिंधूने एक तास सात मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१३, १३-२१, २१-१८ अशी प्रतिस्पर्ध्यावर मात केली. २0१३ ची चॅम्पियन इंतानोन रेचानोक पहिल्याच फेरीत गारद झाल्यानंतर जिंडापोल हिच्यावर मोठी जबाबदारी होती. तिने सुरेख खेळ केला; परंतु सिंधू तिच्यापेक्षा एक पाऊल पुढेच राहिली. या सामन्यात सिंधूचा तिच्याविरुद्ध रेकॉर्ड २-१ असा होता. सिंधूने आपल्या प्रतिस्पर्ध्याला कोर्टच्या चोहोबाजूला पळवले. पहिल्या गेममध्ये दोघी सुरुवातीला ६-६ असे बरोबरीत होत्या; परंतु त्यानंतर सिंधूने ७-३ अशी आघाडी घेतली. तिने बॅकहँडवर जबरदस्त परतीचे फटके मारताना ८-३ अशी आघाडी घेत ती ब्रेकपर्यंत कायम ठेवली. ब्रेकनंतर तिची आघाडी १५-७ अशी झाली. प्रतिस्पर्धी खेळाडूदेखील दुहेरी गुणांपर्यंत पोहोचली; परंतु ती लय कायम ठेवू शकली नाही आणि सिंधूने पहिला गेम जिंकला. दुसºया गेममध्ये जिंडापोलने जोरदार मुसंडी मारत ७-३, ११-३ आणि १४-१0 अशी आघाडी घेतली. तथापि, सिंधूने सलग तीन गुण घेत ही आघाडी १३-१७ अशी केली. दोन फटके बाहेर गेल्याने जिंडापोलला ७ गुण घेण्याची संधी मिळाली आणि तिने गेम जिंकत बरोबरी साधली. तिसºया गेममध्ये सिंधूने सुरेख खेळ करीत सामना आपल्या नावावर केला.
>प्रणॉयची विजयी सुरुवात
त्याआधी बुधवारी रात्री एच. एस. प्रणॉयने आठव्या मानांकित चोऊ तियेन चेन याचा ९-२१, २१-१८, २१-१८ असा पराभव केला होता. आता तो इंडोनेशियाच्या टामी सुगियातो याच्याविरुद्ध खेळेल. प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांनी जर्मनीच्या मार्विन एमील सेइडेल आणि लिंडा एफलेर यांचा २१-१९, २१-१३, असा पराभव केला. आता ते चीनच्या वांग यिलयू आणि हुआंग डोंगपिंग यांच्याविरुद्ध खेळतील.