सिंधू, प्रणीत दुसऱ्या फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:36 AM2019-10-16T04:36:27+5:302019-10-16T04:36:39+5:30
डेन्मार्क ओपन बॅडमिंटन : रंक्कीरेड्डी-शेट्टी जोडीची विजयी सुरुवात
ओडेन्से : विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने डेन्मार्क ओपनमध्ये मंगळवारी इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुंजुंगचा पराभव करीत विजयी सुरुवात केली. पाचव्या मानांकित सिंधूला माजी विश्व ज्युनिअर चॅम्पियन इंडोनेशियाच्या खेळाडूने दोन्ही गेम्समध्ये कडवी लढत दिली. सिंधूने ३८ मिनिट रंगलेल्या या लढतीत २२-२०, २१-१८ ने विजय साकारत या खेळाडूविरुद्धचा शंभर टक्के विजयाचा रेकॉर्ड कायम राखला. आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला पुढच्या फेरीत कोरियाच्या अन से यंगच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बी. साई प्रणीतने शानदार विजय मिळवताना पहिल्या फेरीत दिग्गज चीनच्या लिन डॅन याचा ३५ मिनिट रंगलेल्या लढतीत २१-१४, २१-१७ ने पराभव केला. हैदराबादच्या या बॅडमिंटनपटूला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला व दोनवेळा जागतिक विजेतेपदाचा मान मिळवणाºया जपानच्या केंटो मोमोटाच्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. मोमोटाने अलीकडेच स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये प्रणीतला पराभवाचा धक्का दिला होता. सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत विजयाने सुरुवात केली. भारतीय जोडीने कोरियाच्या किम जी जुंग व ली योग डेई या जोडीचा २४-२२, २१-११ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)
राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी चॅम्पियन पारुपल्ली कश्यपला मात्र पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्याला थायलंडच्या सित्तिकोम थाम्मासिनविरुद्ध १३-२१, १२-२१ ने पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्माचे आव्हान पुरुष एकेरीत पराभवासह संपुष्टात आले. नेदरलँडच्या मार्क कालजोविरुद्ध पहिला गेम जिंकल्यानंतर सौरभला लय कायम राखता आली नाही. त्याला या लढतीत २१-१९, ११-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.