जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यास सिंधू, सायना सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:28 AM2019-03-06T04:28:23+5:302019-03-06T04:28:58+5:30
खडतर ड्रॉनंतरही भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल बुधवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताची जेतेपदाची दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत.
बर्मिंघम : खडतर ड्रॉनंतरही भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल बुधवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताची जेतेपदाची दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत.
जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) विश्व मानांकनातील अव्वल ३२ मध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत स्थान मिळते. यावेळी भारताच्या केवळ तीन खेळाडूंना मानांकन देण्यात आले आहे. सिंधू व सायना यांच्या व्यतिरिक्त पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतला सातवे मानांकन मिळाले आहे. आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेता पाचवे मानांकन प्राप्त सिंधू १० लाख डॉलर पुरस्कार राशी असलेल्या या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात दक्षिण कोरियाची जागतिक क्रमवारीतील माजी नंबर दोन खेळाडू सुंग जी ह्यूनविरुद्ध करणार आहे.
लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती व आठवे मानांकन प्राप्त सायना पहिल्या फेरीत स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरविरुद्ध खेळेल. सायनाने क्रिस्टीविरुद्ध आतापर्यंत सहाही लढतींमध्ये विजय मिळवला आहे तर सिंधू सुंग जीविरुद्ध गेल्या १४ पैकी ८ सामन्यांत विजय मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. सहा सामन्यांत तिला पराभव स्वीकारावा लागला.
सिंधू पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात यशस्वी ठरली तर दुसऱ्या फेरीत तिला रशियाच्या येवगेनिया कोसेतस्काया व हाँगकाँगची च्युंग एनगान यी यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
तर सायनाला दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या लाईन होमार्क जार्सफेल्ड व चीनची काई यानयान यांच्यात लढतीतील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.
महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी पहिल्या फेरीत शिहो तनाका व कोहारू योनेमोतो या जपानच्या सातव्या मानांकित जोडीविरुद्ध खेळतील. (वृत्तसंस्था)