सिंधू, श्रीकांतचे जेतेपदाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 01:02 AM2018-07-10T01:02:59+5:302018-07-10T01:03:19+5:30
भारताचे अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे इंडोनेशिया ओपनमधील शानदार कामगिरी कायम ठेवताना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याकडे लक्ष असणार आहे.
बँकॉक - भारताचे अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे इंडोनेशिया ओपनमधील शानदार कामगिरी कायम ठेवताना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याकडे लक्ष असणार आहे. सिंधू आणि श्रीकांत गत सत्रात सुरेख लयीत होते आणि अनेक स्पर्धा जिंकण्यात ते यशस्वी ठरले होते; परंतु या हंगामात सातत्यपूर्वक कामगिरीनंतरही या दोघांनाही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही.
सिंधू इंडिया ओपन आणि राष्ट्रकुल स्पर्धेत उपविजेती ठरली होती, तर श्रीकांतने गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. संमिश्र सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले होते. बीडब्ल्यूएफ विश्व टूरच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या पहिल्या टप्प्यातील दोन स्पर्धेत लय मिळाल्यानंतरही भारतीय खेळाडू विजेतेपद पटकावू शकले नाहीत. सिंधू दोन आठवड्यात अनुक्रमे उपांत्य फेरी आणि उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली, तर या दोन्ही स्पर्धेत श्रीकांतचे आव्हान जपानच्या केंतो मोमोता याने अनुक्रमे उपांत्य फेरी व पहिल्या फेरीत संपुष्टात आणले. सिंधू या आठवड्यात बुल्गारियाच्या लिंडा जेटचिरिविरुद्ध या स्पर्धेत प्रारंभ करील तर पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना क्वॉलीफायर खेळाडूविरुद्ध होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कारकीर्दीतील दुसरे सुवर्णपदक जिंकणारी सायना नेहवाल थायलंडच्या बुसनान ओंगबुरूंगपान हिच्याविरुद्ध पहिल्या फेरीत खेळेल. स्वीस ओपनचा विजेता समीर वर्मादेखील स्पर्धेत आपला ठसा उमटविण्यास सज्जा आहे. (वृत्तसंस्था)
जयरामला उपविजेतेपद
गाचिन (रशिया) : दुखापतीनंतर पुनरागमन करणारा अजय जयराम याला व्हाईट नाईट्स इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तो अंतिम फेरीत स्पेनचा अव्वल मानांकित पाब्लो आबियानविरुद्ध पराभूत झाला. जयरामला पाब्लोविरुद्ध पहिला गेम जिंकल्यानंतरही ५५ मिनिटे रंगलेल्या या लढतीत २१-११, १६-२१, १७-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, तरूण कोना आणि सौरभ शर्मा या पुरुष दुहेरीच्या जोडीला उपांत्य फेरीत जर्मनीच्या बार्ने गेइस - यान कोलिन वाल्कर या जोडीविरुद्ध २१-१८, १३-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.