सायनाविरुद्ध सिंधू ‘फायनल’ रंगणार, श्रीकांत-प्रणय यांच्यात पुरुष एकेरीचा अंतिम सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 04:12 AM2017-11-08T04:12:06+5:302017-11-08T04:12:43+5:30
विश्व क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेली‘फुलराणी’ सायना नेहवाल आणि रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू यांच्यात
नागपूर : विश्व क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेली‘फुलराणी’ सायना नेहवाल आणि रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू यांच्यात आज बुधवारी ८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेचा महिला एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे.
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या वतीने कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेत पुरुष गटात जगात दुसºया स्थानावर असलेला किदाम्बी श्रीकांत आणि ‘जायंट् किलर’ अशी ख्याती असलेला एच. एस. प्रणय हे जेतेपदासाठी लढत देतील. मंगळवारी महिला एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात अनुभवी सायनाने गोव्याची अनुरा प्रभुदेसाई हिच्यावर २१-११, २१-१० ने ३० मिनिटात विजय साजरा केला. दुसºया उपांत्य सामन्यात पी. व्ही. सिंधूने तीन गेममध्ये जी. ऋत्विक शिवानीचे आव्हान ५० मिनिटांत १७-२१, २१-१५,२१-११ असे संपुष्टात आणले. सिंधूने पहिला गेम गमविल्यानंतर अनुभव पणाला लावला हे विशेष.
प्रणयने पहिल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राचा खेळाडू शुभांकर डे याचा २१-१४, २१-१७ ने पराभव केला. दुसºया उपांत्य सामन्यात युवा प्रतिभावान उत्तराखंडचा लक्ष्य सेन याने श्रीकांतला बराच घाम गाळायला लावला. श्रीकांतने अनुभवाच्या आधारे २१-१६, २१-१८ने बाजी मारली. आठवडाभराआधी फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात उभय खेळाडू परस्परांपुढे आले होते. मिश्र दुहेरीचा अंतिम सामना सात्त्विक साईराज- अश्विनी पोनप्पा-प्रणव जेरी चोप्रा- एन. सिक्की रेड्डी यांच्यात होईल. साईराज- अश्विनी यांनी संयम शुक्ला- संयोगिता घोरपडे यांच्या पहिल्या गेममधील चार मिनिटांत माघारीनंतर फायनलचे तिकीट मिळविले. प्रणव- सिक्की रेड्डी यांना मात्र तासभराहून अधिक वेळ चाललेल्या दुसºया उपांत्य लढतीत अल्विन फ्रान्सिस-अपर्णा बालन यांच्याविरुद्ध २१-१६, २२-२४, २१-८ असा घाम गाळावा लागला.
आकडे काय सांगतात...
नऊ वर्षांनंतर सायना सिनियर राष्टÑीय स्पर्धेत उतरली आहे.
२७ जानेवारी २००८ रोजी पणजी येथे झालेल्या राष्टÑीय स्पर्धेत सायना विजेती होती.
त्यानंतर राष्टÑीय स्तरावर नागपुरात ती प्रथमच कोर्टवर उतरली.
पी. व्ही. सिंधू २०१३ मध्ये अखेरची सिनियर राष्ट्रीय स्पर्धा खेळली.
सिंधूने यंदा सायनाला इंडिया ओपन सुपर सिरिजच्या उपांत्यपूर्व सामन्यात २१-१६, २२-२० ने नमविले होते.
२०१४ च्या सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्स स्पर्धेत सायनाने सिंधूचा सरळ गेममध्ये २१-१४, २१-१७ असा पराभव करीत विजेतेपद पटकविले होते.
त्यानंतर प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत (पीबीएल) उभय खेळाडू दोनदा एकमेकींविरुद्ध सामना खेळल्या. दोघींनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.
श्रीकांत-प्रणय हे देखील ४ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.