सिंधूने काढला वचपा, जपानच्या ओकुहाराला नमवून जिंकले विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:16 AM2017-09-18T01:16:02+5:302017-09-18T01:16:21+5:30
भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या वर्ल्ड चॅम्पियन नोजोमी ओकुहारा हिला नमवून कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद उंचावले.
सोल : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या वर्ल्ड चॅम्पियन नोजोमी ओकुहारा हिला नमवून कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद उंचावले. या शानदार विजयासह सिंधूने नुकताच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात ओकुहाराकडून मिळालेल्या पराभवाचा वचपाही काढला. एक तास २३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात सिंधूने २२-२०, ११-२१, २१-१८ अशी बाजी मारली.
विशेष म्हणजे, एका महिन्यातच दुस-यांदा सिंधू व ओकुहारा यांच्यात अंतिम सामना होत असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोघींनीही आपल्या लौकिकास साजेशा खेळ करताना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याप्रमाणेच तगडा खेळ केला. सिंधूने पुन्हा एकदा आपल्या झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर अंतिम व निर्णायक गेम जिंकत जेतेपदाला गवसणी घातली. त्याचप्रमाणे, ओकुहाराला ऑस्ट्रेलियन ओपन आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर सलग तिसरे जेतेपद उंचावण्याची नामी संधी होती. परंतु सिंधूने शानदार कामगिरी करताना ओकुहाराच्या हॅट्ट्रिकचे स्वप्न धुळीस मिळवले.
आक्रमक सुरुवात करताना सिंधूने आघाडी मिळवली होती, पण ओकुहाराने लवकरच तिला गाठत बरोबरी साधली. दोघींनी अनेक लांबलचक रॅली खेळताना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची झलक सर्वांना दाखवली. पहिल्या गेमच्या मध्यंतराला आघाडी घेत ओकुहाराने नियंत्रण मिळवले होते. यानंतर सिंधूने जबरदस्त पुनरागमन करताना २०-२० अशी बरोबरी साधली. यानंतर सलग दोन गुण वसूल करत सिंधूने पहिल्या गेमसह सामन्यात आघाडी घेतली.
दुस-या गेममध्ये मात्र ओकुहाराने दमदार पुनरागमन केले. तुफानी फटके मारताना तिने सिंधूवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले. या वेळी सिंधूकडून अनेक चुका झाल्या आणि त्याचा फायदा घेत ओकुहाराने सामना बरोबरीत आणला. तिस-या व अंतिम गेममध्ये सिंधूने जबरदस्त टक्कर देताना ओकुहाराला झुंजवले. तिने सुरुवातीपासून वर्चस्व राखत मध्यंतराला ११-५ अशी आघाडी मिळवली. यानंतर ओकुहाराने काहीसा बचावात्मक पवित्रा घेत सिंधूला चुका करण्यास भाग पाडले. याचा फायदा घेत ओकुहाराने १६-१८ अशी पिछाडी कमी केली. परंतु, यानंतर सिंधूने पुन्हा एकदा नियंत्रण मिळवताना जेतेपद निसटणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत शानदार बाजी मारली.गत महिन्यात ग्लासगो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधू ओकुहाराविरुद्ध पराभूत झाली होती. या सामन्याला बॅडमिंटन तज्ज्ञांनी सर्वोत्तम सामन्यांपैकी एक ठरविले होते. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सिंधूने २०१६ साली चायना सुपर सिरीज आणि इंडियन ओपन सुपर सिरीज स्पर्धा जिंकली होती. या विजयासह सिंधूने ओकुहाराविरुद्धचा रेकॉर्ड बरोबरीत केला आहे. हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध ८ वेळा लढले असून दोघींनी प्रत्येकी ४ विजय मिळवले आहेत.
>जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आघाडीवर असतानाही मी पराभूत झाले होते. पण या सामन्यात माझ्या मनात त्या सामन्याचा कोणताही विचार नव्हता. मी फक्त पुढील गुण जिंकण्याचाच विचार करीत होते. मला खेळावर आणखी नियंत्रण मिळवायचे असल्याने माझ्या मनात आणखी कोणत्याही गोष्टी नव्हत्या. पहिला गेम जिंकल्यानंतर मी नियंत्रण गमावले. ही खूप मोठी आघाडी होती आणि जर मी प्रयत्नही केले असते तरी पराभूत झाले असते. तिसºया गेममध्ये प्रत्येक गुण महत्त्वाचा होता. आगामी जपान ओपन स्पर्धेतही ओकुहाराविरुद्ध सामना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण असे नाही. माझ्यापुढे कोणीही येऊ शकतं आणि त्या खेळाडूला नमवून विजय मिळवावा लागेल.
- पी. व्ही. सिंधू
>आम्ही अधिक आक्रमक होण्यावर थोडे लक्ष दिले. कोरिया स्पर्धेआधी जो काही वेळ मिळाला त्यात ग्लासगो स्पर्धेतील चुका टाळण्यावर भर दिला. आता पुढे अनेक स्पर्धा आहेत, पण माझ्या मते वर्षातील अखेरच्या दुबई फायनलआधी एकावेळी एका स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल.
- पी. गोपीचंद, राष्ट्रीय प्रशिक्षक
>शुभेच्छांचा ‘टिवटिवाट’...
कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकल्याबद्दल सिंधूचे अभिनंदन. तिने मिळवलेल्या यशाचा भारताला गर्व आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सिंधूने खूप कमालीचा खेळ दाखवला. जेतेपदासाठी खूप अभिनंदन. देशाला तुझा अभिमान आहे. तुझ्या विजयाची ही लय कधी तुटू नये.
- राज्यवर्धन राठोड, केंद्रीय क्रीडामंत्री
तू प्रयत्न केलेस, तू अपयशी ठरलीस पण तू स्वत:वर भरवसा ठेवला. आज तू संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनली आहेस.
- सचिन तेंडुलकर
२२ वर्षांच्या वयामध्ये सिंधू महान आणि खूप कमालीची खेळाडू आहे. अंतिम सामन्यात विजयी ठरल्याबद्दल अभिनंदन.
- वीरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू
सिंधू आणि ओकुहारा यांच्यातील
स्पर्धा महान प्रतिस्पर्धीमधील एक होत चालली आहे. जेतेपदाच्या शुभेच्छा सिंधू.
- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण,
माजी क्रिकेटपटू
सिंधूने स्वत:वर विश्वास ठेवला आणि तो पूर्ण केला. ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ठरल्याने तिचे अभिनंदन. भारताला तुझ्यावर गर्व आहे.
- विजेंदर सिंग, स्टार बॉक्सर