श्रीकांतचा फ्रेंच ओपनवर कब्जा, अंतिम लढतीत जपानच्या निशिमोटोवर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 08:39 PM2017-10-29T20:39:05+5:302017-10-29T21:36:04+5:30
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
पॅरिस - भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने जपानच्या केंटा निशिमोटोवर 21-14, 21-13 अशी सरळ गेममध्ये मात केली. श्रीकांतचे हे एकूण सहावे आणि यंदाच्या वर्षातील चौथे सुपर सिरिज विजेतेपद आहे.
श्रीकांत आणि निशिमोटा यांच्यातील अंतिम लढत अवघी 34 मिनिटे चालली. या अंतिम लढतीवर श्रीकांतने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. त्याने पहिल्या गेममध्ये जपानी बॅडमिंटनपटूने आव्हान परतवून लावत हा गेम 21-14 असा आरामात जिंकला आणि लढतीत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी न देता श्रीकांतने हा गेम 21-13 असा मोठ्या फरकाने जिंकत सामन्यासह विजेतेपदावर कब्जा केला.
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने आपलाच सहकारी एच.एस. प्रणॉयला २-१ ने पराभूत करून फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. श्रीकांतला पहिल्या गेममध्ये त्याच्या मनासारखा खेळ करता आला नाही. सूर न गवसलेल्या श्रीकांतला पहिली गेम १४-२१ ने गमवावी लागली. पण दुस-या आणि तिस-या गेममध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अनुक्रमे २१-१९ आणि २१-१८ असे गेम जिंकून प्रणॉयला पराभूत केले. ही लढत १ तास २ सेकंद चाली होती. या सत्रातील चौथे विजेतेपद जिंकण्यासाठी श्रीकांतची अंतिम फेरीत लढत जपानच्या केन्टा निशीमोटोविरुद्ध होईल. निशीमोटोने उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या अॅन्ड्रेस अॅन्टोसेनला सरळ दोन सेटमध्ये २१-१७, २१-१५ असे पराभूत केले.