श्रीकांतने जिंकली डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 09:53 PM2017-10-22T21:53:46+5:302017-10-22T22:16:07+5:30
भारताचा आघाडीचा बॅडंमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
ओडेन्से - भारताचा आघाडीचा बॅडंमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने कोरियाच्या ली ह्युन याच्यावर 21-10, 21-5 अशी सरळ गेममध्ये मात केली. श्रीकांतचे हे तिसरे सुपर सीरिज विजेतेपद आहे.
डेन्मार्क ओपनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीवर भारताच्या श्रीकांतने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. अवघी 25 मिनिटे चाललेल्या लढतीत श्रीकांतच्या आक्रमणासमोर दक्षिण कोरियाचा ली ह्युन पूर्णपणे निष्रभ ठरला. आक्रमक सुरुवात करणाऱ्या श्रीकांतने पहिला गेम 21-10 अशा मोठ्या फरकाने जिंकत अंतिम लढतीत आघाडी घेतली. त्यानंतर श्रीकांतने आपल्या खेळातील आक्रमकता अधिक वाढवत दुसरा गेमही 21-5 अशा मोठ्या फरकाने जिंकला आणि स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.
#FLASH: Kidambi Srikanth beat Lee Hyun-Il of Korea 21-10, 21-5 to win #DenmarkSSP and his 3rd Superseries Premier title pic.twitter.com/1MlaY4EFd8
— ANI (@ANI) October 22, 2017
तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्य लढतीत श्रीकांतने हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटचा २१-१८, २१-१७ ने पराभव करीत डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टर अॅक्सेलसेनला पराभवाचा धक्का देणा-या श्रीकांतने शनिवारी उपांत्य लढतीतही कामगिरीत सातत्य राखले. पहिल्या गेममध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर श्रीकांतने दुस-या गेममध्येही लय कायम राखत विजय साकारला.