दुहेरीतील खेळाडूंना झेप घेण्यास वेळ लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 03:11 AM2017-11-10T03:11:13+5:302017-11-10T03:11:26+5:30
व्यावसायिक सर्किटमध्ये भारताच्या दुहेरीतील खेळाडूंची प्रगती चांगली होत असल्याचा आनंद आहे. तथापि, विश्वस्तरीय खेळाडूंना हरविणारे खेळाडू म्हणून पुढे येण्यास भारतीयांना थोडा वेळ लागेल
नवी दिल्ली : व्यावसायिक सर्किटमध्ये भारताच्या दुहेरीतील खेळाडूंची प्रगती चांगली होत असल्याचा आनंद आहे. तथापि, विश्वस्तरीय खेळाडूंना हरविणारे खेळाडू म्हणून पुढे येण्यास भारतीयांना थोडा वेळ लागेल, असे मत अनुभवी बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा हिने गुरुवारी व्यक्त केले.
मागील काही वर्षांपासून दुहेरीत भारतीय खेळाडूंनी चांगले निकाल दिले. त्यात सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग सेन यांच्या नव्या पुरुष जोडीने कोरिया आणि फ्रान्समधील सुपरसीरिजमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांच्या मिश्र जोडीने जपान ओपनच्या उपांत्य फेरीत धडक दिली होती. काल नागपुरात संपलेल्या ८२ व्या सिनियर राष्टÑीय स्पर्धेत दोन जेतेपदाची मानकरी ठरलेली अश्विनी पुढे म्हणाली, ‘माझ्या मते दुहेरीतील खेळाडू योग्य दिशेने वाटचाल करीत आहेत; पण आघाडीच्या स्थानावर विराजमान होण्यास वेळ लागेल. दुहेरीच्या खेळाडूंना सोबत सराव करावा लागतो. उभय खेळाडूंमध्ये संयोजन येण्यास वेळ लागतो. तुलनेत एकेरीत खेळाडूंना हे सर्व करण्याची गरज भासत नाही; पण माझ्या मते चिराग आणि सात्त्विक योग्य दिशेने जात आहेत. प्रणव-सिक्की यांचाही प्रवास चांगला आहे. यामुळे सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावतो आणि त्यांना प्रेरणा लाभते.’
अश्विनीने काल सात्त्विक साईराजसोबत मिश्र गटाचे तसेच सिक्की रेड्डीसोबत महिला दुहेरीचे जेतेपद पटकविले होते.
पदक जिंकण्याचे आव्हान स्वीकारणार
सिनियर राष्टÑीय स्पर्धेतील समावेशाबाबत विचारताच ती म्हणाली, ‘विजय कुणालाही आवडतो. अनेक वर्षांपासून दिग्गज खेळाडू राष्टÑीय स्पर्धेत सहभागी होत नव्हते. यंदा सर्वजण खेळल्याने राष्टÑीय आयोजन आगळेवेगळे ठरले. माझ्यासाठी हे खास आहे. याआधी मी मिश्र गटाचे जेतेपद कधीही पटकविले नव्हते.’
बंगळुरू येथील २८ वर्षांची अश्विनी देशातील
दुहेरी खेळाडूंमध्ये सर्वांत अनुभवी आहे. ज्वाला गुट्टाच्या सोबतीने अश्विनीने विश्व चॅम्पियनशिपचे कांस्य जिंकले होते. नवी दिल्ली राष्ट्रकुलचे सुवर्ण आणि ग्लास्गो स्पर्धेचे रौप्यपदकही जिंकले. अश्विनीकडून तिसºयांदा राष्टÑकुल पदकाची आशा आहे, पण तिने मात्र हे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘मी निश्चितपणे पदक जिंकण्याचे आव्हान स्वीकारणार आहे.’ राष्टÑकुलचे आयोजन पुढील वर्षी आॅस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिलदरम्यान होईल.