पी.व्ही.सिंधूला आता तरी अंतिम फेरीचा चक्रव्यूह भेदणे शक्य होईल का ?
By परब दिनानाथ | Published: September 16, 2017 01:42 PM2017-09-16T13:42:42+5:302017-09-16T15:02:45+5:30
सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या पीव्ही सिंधूने पुन्हा एकदा कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
सेऊल, दि. 16 - सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या पीव्ही सिंधूने पुन्हा एकदा कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मागच्या दोन-तीन वर्षात सिंधूने बॅडमिंटनमधील अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. तिने अनेक सुपर सिरीज स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे पण प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये सिंधूला अनेकदा अंतिम फेरीचा अडथळा भेदता आलेला नाही. ऑलिम्पिक, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धांवर नजर टाकली तर, ही बाब सहज लक्षात येईल.
बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक आणि वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा समजल्या जातात. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदकविजेती कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. सलग दोनवर्ष सिंधूने या स्पर्धेत ब्राँझपदक विजेती कामगिरी केली. पण अद्यापपर्यंत तिला सुवर्णपदक मिळवता आलेले नाही. मागच्या महिन्यातच सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिपची अंतिम फेरी गाठली होती. यावेळी सिंधू हमखास विजेतेपद पटकावेल असा अनेकांना विश्वास वाटत होता. पण जपानच्या नोझोमी ओकुहाराने 19-21, 22-20, 20-22 असा सरळ तीनगेममध्ये पराभव केला.
मागच्यावर्षी सिंधूने ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली होती. सर्व देशवासियांच्या नजरा टीव्हीवर खिळल्या होत्या. या क्रिकेटवेडया देशात बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळावे अशी सर्वांची मनापासून इच्छा होती. पण सिंधूला अंतिमफेरीचा चक्रव्युह भेदता आला नाही. स्पेनच्या कॅरोलिना मारीनने सिंधूला 21-19, 12-21, 15-21 असे पराभूत केले. सर्वांना श्वास रोखून धरायला लावणा-या या सामन्यात सिंधूने शेवटच्या मिनिटापर्यंत संघर्ष केला. 83 मिनिट रंगलेल्या या सामन्यात सिंधूचा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे कोरियन सुपर सिरीजमध्ये अंतिमफेरीतील पराभवाची मालिका खंडीत व्हावी अशी अनेकांची मनापासून इच्छा आहे.
आज आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनच्या खेळात भारताचा जो दबदबा निर्माण झाला आहे त्यात सायना नेहवाल आणि सिंधू या दोघींचा सिंहाचा वाटा आहे. भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारी सिंधू सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव उज्वल करणा-या सिंधूला भारत सरकारने पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
कोरियन ओपनमध्ये पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी
सिंधूने शनिवारी चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा पराभव करत कोरियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिमफेरीत प्रवेश केला. एक तास सहा मिनिटे हा सामना सुरु होता. सिंधूचा अंतिम सामना जपानच्या नोझोमी ओकुहारा विरुद्ध होणार आहे. मागच्या महिन्यातच वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिपमध्ये ओकुहाराकडून पराभव झाल्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. सिंधूला कोरियन सुपर सिरीजच्या निमित्ताने पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे.