विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप : पी.व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 03:10 AM2017-08-25T03:10:55+5:302017-08-25T03:11:15+5:30
रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय स्टार पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.
ग्लास्गो : रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय स्टार पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. २०१३ आणि २०१४ च्या विश्व स्पर्धेत कांस्य पदके जिंकणारी सिंधू हिला महिला एकेरीत विजयासाठी चांगलेच झुंझावे लागले. हाँगकाँगची चेयुंग नागन यी हिचा सिंधूने १९-२१, २३-२१, २१-१७ अशा फरकाने पराभव केला. अतिशय चुरशीचा हा सामना तब्बल १ तास २७ मिनिटे रंगला. २२ वर्षांच्या सिंधूने पहिला गेम १९-२१ असा गमविल्यानंतर दुसºया गेममध्ये १३-१६ अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. सिंधूचे परतीचे फटके फारच सुरेख होते. अनेकदा तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवित अनुभवाचा परिचय दिला. सिंधूची पुढील फेरीत गाठ पडेल ती चीनची पाचवी मानांकित खेळाडू सून यू हिच्याविरुद्ध.
श्रीकांतने मात्र पुरुष एकेरीत सरळ गेममध्ये आणखी एक विजय साजरा केला. श्रीकांतने डेन्मार्कचा आंद्रेस अँटोसेन याच्यावर २१-१४, २१-१८ ने मात केली. विश्व क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतचा हा सलग १२ वा विजय होता. श्रीकांतला आता अव्वल स्थानावर असलेला कोरियाचा सोन वान हो याच्याविरुद्ध खेळावे लागेल. वान हो याच्याविरुद्ध श्रीकांतच्या विजयाचा रेकॉर्ड ४-४ असा आहे.
आजचा सामना माझ्यासाठी फारच लाभदायी ठरला. मी अनेकदा मोठ्या रॅलिज खेळलो. एकूणच विजयावर खूष आहे, असे श्रीकांतने सामन्यानंतर सांगितले. याआधी मागच्या दोन्ही स्पर्धांमध्ये श्रीकांत हा उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करू शकला नव्हता. यंदा जून महिन्यात इंडोनेशिया तसेच आॅस्ट्रेलिया ओपनदरम्यान श्रीकांतने होवर विजय नोंदविला होता. पुढील लढतीबद्दल तो म्हणाला,‘हा सामना सोपा नसेल पण मी प्रत्येक सामन्यागणिक प्रगती साधत आहे. उद्यादेखील सामना जिंकेल, असा विश्वास वाटतो.’ मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला डेबी सुसांतो-प्रवीण जॉर्डन या इंडोनेशियाच्या जोडीकडून २२-२०, १६-२१, १६-२१ ने पराभवाचे तोंड पहावे लागले.(वृत्तसंस्था)