विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप: पी.व्ही. सिंधूचे पदक निश्चित, पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:58 PM2017-08-25T23:58:42+5:302017-08-25T23:58:56+5:30
आॅलिम्पिक रौप्य विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने शुक्रवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक देत देशासाठी पदक निश्चित केले. दुसरीकडे किदाम्बी श्रीकांत याला पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही.
ग्लास्गो : आॅलिम्पिक रौप्य विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने शुक्रवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक देत देशासाठी पदक निश्चित केले. दुसरीकडे किदाम्बी श्रीकांत याला पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही.
रिओ आॅलिम्पिकची पदक विजेती सिंधूने विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनची सून यू हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवित किमान कांस्य निश्चित केले. २०१३ आणि २०१४ मध्ये कांस्य जिंकणाºया २२ वर्षांच्या सिंधूने आज ३९ मिनिटांत २१-१४, २१-९ अशा फरकाने विजय साजरा केला. विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सिंधूची उपांत्य फेरीत दहाव्या स्थानावर असलेली चीनची चेन युफेईविरुद्ध गाठ पडणार आहे. युफेईने थायलंडची माजी चॅम्पियन रतनचोक इंतानोन हिच्यावर विजय नोंदविला.
श्रीकांतला पदकाचा प्रबळ दावेदार समजले जात होते. इंडोनेशिया तसेच आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये जेतेपद तसेच सिंगापूर ओपनमध्ये दुसºया स्थानावर राहिलेला श्रीकांत फॉर्ममध्ये होता. तथापि कोरियाच्या सीन वान याने त्याच्यावर ४९ मिनिटांत विजय मिळविला. डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सलसन आणि पाच वेळेचा चॅम्पियन लिन दान हे देखील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल झाले.
सिंधूने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत थेट विजय साजरा होईस्तोवर मागे वळून पाहिले नाही. पहिल्या गेममध्ये सून यू निराश दिसली. सिंधूने याचा लाभ घेत सात गेमपॉर्इंटसह दर्शनीय ड्रॉप शॉटवर विजय मिळविला.दुसºया गेमची सुरुवात दीर्घ रॅलीसह झाली. पण सिंधू तब्बल १८-८ ने आघाडीवर जाताच सामना संपणार हे निश्चित झाले. सून हिने मारलेला फटका बाहेर जाताच सिंधूने गेम आणि सामना जिंकला. सिंधूने शानदार खेळ करीत प्रतिस्पर्धी खेळाडूला कोर्टवर चारही दिशेने धावायला भाग पाडले. काही वेळा तिने चाणाक्षपणे खेळून चीनच्या खेळाडूला चकितही केले. दोन्ही गेममध्ये सिंधूचे फटके परतविण्याच्या प्रयत्नांत चीनच्या खेळाडूची चांगलीच दमछाक झाली होती. सिंधूने मिळविलेला हा अप्रतीम विजय ठरला.(वृत्तसंस्था)
श्रीकांत स्पर्धेबाहेर
दुसरीकडे श्रीकांतची सुरुवात खराब झाल्याने वानने लवकरच मोठी आघाडी संपादन केली. पण श्रीकांतला उशिरा सूर गवसताच गेममध्ये ८-८ अशी बरोबरी झाली होती. श्रीकांतने केलेल्या काही चुकांचा देखील त्याला फटका बसला. दुसºया गेमच्या सुरुवातीला प्रतिस्पर्धी खेळाडूने आघाडी मिळविल्यानंतर श्रीकांतने सलग सात गुणांची कमाई करताच गुणसंख्या १२-१६ अशी झाली होती. श्रीकांतने काही फटके बाहेर मारताच कोरियाच्या खेळाडूचा विजय साकार झाला तर सलग १३ सामने जिंकण्याचे श्रीकांतचे स्वप्न मात्र भंगले.श्रीकांतने या लढतीपूर्वी जून महिन्यात सोन वानविरुद्ध (इंडोनेशिया सुपर सीरिज व आॅस्ट्रेलिया सुपर सीरिज) दोन सामन्यांत विजय मिळवला होता, पण आजच्या लढतीत मात्र त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. कोरियन खेळाडूने शानदार कामगिरी करताना ४९ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१४, २१-१८ ने विजय मिळवला. दुसºया गेममध्ये श्रीकांत सुरुवातीला संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. सोन वानने ७ गुणांची आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर श्रीकांतने काही गुण घेतले, पण कोरियन खेळाडूने १३-५ अशी आघाडी घेतली होती.
पी. व्ही. सिंधू
‘‘ मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे. सून यू प्रतिस्पर्ध्यापुढे आव्हान निर्माण करणारी खेळाडू आहे. मी सर्वोत्तम कामगिरी केली आणि सर्वकाही माझ्यासाठी अनुकूल ठरले. गेल्यावेळी दुबईमध्ये मला तिच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.’’