वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सायना नेहवालचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 04:10 PM2017-08-23T16:10:31+5:302017-08-23T16:59:53+5:30

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या सबरीना जॅक्वेटवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला.

World Badminton Championship - Saina won the first game in 14 minutes | वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सायना नेहवालचा दणदणीत विजय

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सायना नेहवालचा दणदणीत विजय

Next

ग्लासगो, दि. 23 - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या सबरीना जॅक्वेटवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. तिने सबरीनावर 21-11, 21-12 असा विजय मिळवून उपउपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. यूकेमध्ये ग्लासगो येथे ही स्पर्धा सुरु आहे. सायनाने पहिला गेम अगदी सहज जिंकला. 

सायनाने अवघ्या 14 मिनिटात पहिला गेम जिंकला. तिच्या झंझावती खेळासमोर सबरीना पूर्णपणे निष्प्रभ ठरली. या विजयामुळे सायनाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल. पुढच्या फेरीत सायनाचा सामना भारताची तन्वी लाड आणि कोरीयाच्या सुंग जी ह्युआन यांच्यातील विजेत्याशी होईल. सुंग जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर आहे. 

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली. काल पहिल्या दिवशी भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने एकतर्फी झालेल्या सामन्यात रशियाच्या सर्जी सिरांत याचा सरळ दोन गेममध्ये फडशा पाडून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर रिओ ऑलिम्पिकची रौप्यविजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधूने किम जोचा पराभव करत विजयी सुरुवात केली. 

सिंधूने कोरियन प्रतिस्पर्धी किम ह्यो मिनचा 21-16 आणि 21-14 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.  पहिल्या सामन्यात सिंधूला बाय मिळाला होता. त्यामुळे सिंधूनं आता उपउपांत्यापूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  पुरुष खेळाडूंमध्ये साई प्रणीतने आपली विजयी सुरुवात केली आहे.

यंदा पहिल्यांदाच भारत सुवर्ण पदकाचा दावेदार म्हणून खेळत असून भारताची मदार पुरुष गटात श्रीकांतवर, तर महिला गटात पी. व्ही. सिंधूवर आहे. श्रीकांतने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना सर्जीचा २१-१३, २१-१२ असा ३० मिनिटांहून कमी वेळेत धुव्वा उडवला. सर्वच क्षेत्रात वर्चस्व राखताना श्रीकांतने सर्जीला पुनरागमन करण्याची एकही संधी न देताना बाजी मारली. दुसºया फेरीत श्रीकांतचा सामना फ्रान्सचा लुकास कोर्वी विरुध्द होईल.

स्पेनचा प्रतिस्पर्धी पाब्लो एबियान याने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने समीरची सहज आगेकूच झाली. ज्यावेळी पाब्लोने माघार घेतली तेव्हा समीर २१-८, १७-४ असा आघाडीवर होता. महिलांमध्ये तन्वीने झुंजार खेळ करताना इंग्लंडच्या क्लो बर्चला १७-२१, २१-१०, २१-१९ असे नमवले. मिश्र दुहेरी गटात सात्विकसैराज रंकिरेड्डी आणि मनीषा के. या जोडीने ताम चुन हेई - एनजी त्सझ याऊ या हाँगकाँगच्या जोडीचा २४-२२, २१-१७ असा पाडाव केला.

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत बी.साई प्रणीतने इंडोनेशियाच्या अॅन्थोनी सीनीसुकावर 14-21, 21-18,21-19 असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. 

या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघावर एक नजर  
पुरुष एकेरी - श्रीकांत किदम्बी, अजय जयराम, बी.साई प्रणीत, समीर वर्मा
महिला एकेरी -  पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्ण दास, तन्वी लाड
पुरुष दुहेरी - मनु अत्री आणि सुमित रेड्डी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, श्लोक रामचंद्रन आणि एम.आर.अर्जुन
महिला दुहेरी - आश्विनी पुनप्पा आणि एन.सिकी रेड्डी, संजना संतोष आणि आर्थी सारा सुनील, मेघना जक्कमपुडी आणि पुर्विशा एस.राम
मिश्र दुहेरी- प्रणव चोप्रा आणि एन.सिकी रेड्डी, बी. सुमित रेड्डी आणि आश्विनी पुनप्पा, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि के. मनिषा

Web Title: World Badminton Championship - Saina won the first game in 14 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.