विश्व बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांत, प्रणीत उपउपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:52 AM2018-08-02T03:52:03+5:302018-08-02T03:52:14+5:30
स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीत विजय नोंदवून बुधवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
नानजिंग (चीन) : स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीत विजय नोंदवून बुधवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. विश्व क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेला एच. एस. प्रणय याला ब्राझीलचा इगोर कोल्हो याच्याकडून पराभवाचा धक्का बसला. बी. साईप्रणित हा मात्र पुढील फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.
आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूने इंडोनेशियाची फितरियानी हिच्यावर २१-१४,२१-९ ने सहज विजय नोंदविला. मागच्या वर्षी रौप्य जिंकणाऱ्या २३ वर्षाच्या सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली होती. पुढील फेरीत ती २०१५ च्या विश्व स्पर्धेची कांस्य विजेती कोरियाची सुंग जी ह्यून हिच्याविरुद्ध खेळणार आहे.
पाचवा मानांकित श्रीकांतने स्पेनचा पाबलो एबियन याच्यावर तीन गेमपर्यंत लांबलेल्या सामन्यात २१-१५,१२-२१,२१-१४ अशा फरकाने विजय नोंदविला. मागच्या वर्षी चार जेतेपदाचा मानकरी ठरलेल्या श्रीकांतची आता मलेशियाचा डेरेन ल्यू याच्याविरुद्ध लढत होईल. ल्यूने २०१२ मध्ये फ्रेंच ओपन सुपर सिरिज जिंकली होती.
बी. साईप्रणित याने स्पेनचा लुई एन्रिक पेनालवर याला २१-१८,२१-११ ने पराभूत केले. प्रणीतला पुढील सामन्यात डेन्मार्कच्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध दोन हात करायचे आहेत. प्रणयने चांगली सुरुवात केली धरी पण मधल्या टप्प्यात लय गमविल्याने विश्व क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेल्या कोल्होकडून २१-८,१६-२१,१५-२१ ने पराभवाचा धक्का बसला.
भारताच्या दुहेरीतील खेळाडूंसाठी आजचा दिवस वाईट ठरला. सर्व भारतीय पराभूत झाले. राष्टÑकुलचा रौप्य विजेता सात्त्विक साईराज- चिराग शेट्टी यांना डेन्मार्कचे किम एस्टुप- अँडर्स रासमुसन यांच्याकडून १८-२१,२१-१५,१६-२१ ने पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)