जागतिक बॅडमिंटन : श्रीकांतची विजयी सलामी; समीर, तन्वी यांचीही आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 05:47 AM2017-08-22T05:47:00+5:302017-08-22T05:47:00+5:30
भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने एकतर्फी झालेल्या सामन्यात रशियाच्या सर्जी सिरांत याचा सरळ दोन गेममध्ये फडशा पाडून जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली.
ग्लास्गो : भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने एकतर्फी झालेल्या सामन्यात रशियाच्या सर्जी सिरांत याचा सरळ दोन गेममध्ये फडशा पाडून जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. दुसरीकडे समीर वर्मा आणि तन्वी लाड यांनीही आपआपल्या लढती जिंकताना सकारात्मक सुरुवात केली.
यंदा पहिल्यांदाच भारत सुवर्ण पदकाचा दावेदार म्हणून खेळत असून भारताची मदार पुरुष गटात श्रीकांतवर, तर महिला गटात पी. व्ही. सिंधूवर आहे. श्रीकांतने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना सर्जीचा २१-१३, २१-१२ असा ३० मिनिटांहून कमी वेळेत धुव्वा उडवला. सर्वच क्षेत्रात वर्चस्व राखताना श्रीकांतने सर्जीला पुनरागमन करण्याची एकही संधी न देताना बाजी मारली. दुसºया फेरीत श्रीकांतचा सामना फ्रान्सचा लुकास कोर्वी विरुध्द होईल.
स्पेनचा प्रतिस्पर्धी पाब्लो एबियान याने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने समीरची सहज आगेकूच झाली. ज्यावेळी पाब्लोने माघार घेतली तेव्हा समीर २१-८, १७-४ असा आघाडीवर होता. महिलांमध्ये तन्वीने झुंजार खेळ करताना इंग्लंडच्या क्लो बर्चला १७-२१, २१-१०, २१-१९ असे नमवले. मिश्र दुहेरी गटात सात्विकसैराज रंकिरेड्डी आणि
मनीषा के. या जोडीने ताम चुन हेई - एनजी त्सझ याऊ या हाँगकाँगच्या जोडीचा २४-२२, २१-१७ असा पाडाव केला. (वृत्तसंस्था)