विश्वबॅडमिंटन : भारतीय खेळाडूंची आजपासून मोहीम, सिंधू जेतेपदाच्या निर्धारासह खेळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 05:55 AM2017-08-22T05:55:00+5:302017-08-22T05:55:00+5:30
विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यंदा मला पदकाचा रंग बदलायचा आहे. येथे जेतेपदाच्या निर्धारासह खेळणार, असा विश्वास रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केला.
ग्लासगो : विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यंदा मला पदकाचा रंग बदलायचा आहे. येथे जेतेपदाच्या निर्धारासह खेळणार, असा विश्वास रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केला. मागील दोन्ही विश्व स्पर्धेत सिंधूला कांस्यपदकांवर समाधान मानवे लागले होते.
भारतीय खेळाडूंची विश्व स्पर्धेतील मोहीम आज मंगळवारपासून सुरू होत आहे. त्याआधी बोलताना सिंधू म्हणाली, ‘आॅस्ट्रेलियन ओपननंतर दोन महिने सरावास संधी मिळाली. फॉर्म कायम असल्याने यंदा सर्वोत्कृष्ट कामगिरीसह जेतेपद मिळेल, असा विश्वास आहे. यंदा कांस्य नव्हे, तर त्याहून मोठे पदक जिंकण्यावर माझी नजर असेल. त्यासाठी कडवे आव्हान मोडीत काढण्याचे लक्ष्य आखले आहे.’
२०१६ च्या चायना ओपन तेसच यंदाच्या इंडिया ओपनमध्ये सिंधूने आंतरराष्टÑीय सर्किटमध्ये सनसनाटी निर्माण केली. त्याआधी २०१३ आणि २०१४ च्या विश्वचॅम्पियनशिपमध्ये तिने दोनदा कांस्य जिंकले. सिंधूची सलामीला गाठ पडेल ती कोरियाची किम ह्यो मिन तसेच इजिप्तची हादिया होस्री यांच्यातील विजेत्यांविरुद्ध. आॅलिम्पिक फायनलमध्ये सिंधू स्पेनची कॅरोलिना मारिन हिच्याकडून पराभूत झाली होती. पण यंदा एप्रिल महिन्यात इंडिया ओपनच्या फायनलमध्ये सिंधूने त्या पराभवाची परतफेड केली.
यावर सिंधू म्हणाली, ‘इंडिया ओपन जिंकणे माझ्यासाठी अतिशय मोलाचे झाले होते. स्थानिक चाहत्यांपुढे हा मोठा विजय
होता. रिओच्या सामन्यात अनुपस्थित राहिलेले अनेक जण या जेतेपदामुळे सुखावले.’ (वृत्तसंस्था)
माझी तयारी रिओपेक्षा चांगली : मारिन
रिओ आॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक भक्कम तयारी असल्याने सुवर्ण जिंकण्याची आशा आहे. विश्व चॅम्पियनशिपच्या जेतेपदाची हॅट्ट्रिकदेखील नोंदविण्याचे लक्ष्य असल्याचे माजी विश्वचॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिन हिने म्हटले आहे.
रिओमध्ये सुवर्ण जिंकणारी मारिन पत्रकारांशी बोलताना म्हणाली, ‘रिओ आॅलिम्पिकच्या तुलनेत मागील दोन महिने मी भक्कम तयारी केली आहे. सुवर्णासाठी खेळणे हे माझे मुख्य लक्ष्य असेल. यादरम्यान काही कडव्या संघर्षाचा सामना करावा लागेल, पण जेतेपदाचा विचार करण्याऐवजी दरवेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.’
रिओ आॅलिम्पिकनंतर मारिनला जांघेच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता. यामुळे कामगिरीवर परिणाम झाल्याने एकही जेतेपद जिंकू शकली नव्हती. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान भूषविणारी मारिन म्हणाली, ‘आॅलिम्पिक वर्षभराआधी झाले. मला ते विसरावे लागेल.’
नंतर जखमांनी त्रस्त असल्याने चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. पण आता पुन्हा सज्ज आहे. तिसरी मानांकित मारिनला सुरुवातीला पुढे चाल मिळाली असून तिचा पहिला सामना हाँगकाँग आणि रशियाच्या खेळाडूंमधील सामन्यातील विजयी खेळाडूविरुद्ध होणार आहे.