सांघिक खेळाच्या जोरावर महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 03:51 AM2018-01-20T03:51:39+5:302018-01-20T03:51:42+5:30
महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने सरस कामगिरी करताना शुक्रवारी विजयाची नोंद केली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने मध्यप्रदेशचा ५२-३६ आणि महिला संघाने दिल्ली
ललित नहाटा
चेन्नई : महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने सरस कामगिरी करताना शुक्रवारी विजयाची नोंद केली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने मध्यप्रदेशचा ५२-३६ आणि महिला संघाने दिल्ली संघाचा ७३-५६, अशा गुणफरकाने पराभव केला. विशेष म्हणजे महिला संघाने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारत दिल्लीवर मात केली.
चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत प्रारंभापासून वर्चस्व राखणाºया महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा स्पर्धेतील दुसरा विजय आहे. याआधी महाराष्ट्राने बिहार संघावर ६५-४१ अशी मात
केली होती, तर महिला संघाने या स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. महाराष्ट्राचा संघ पहिल्या पाच मिनिटांतच ६-११ असा पिछाडीवर होता; परंतु त्यानंतर व्यूहरचनेत बदल करताना त्यांनी पहिल्या क्वॉर्टरअखेर १२-१४, अशी २ गुणांनी आघाडी कमी केली.
दुसºया क्वॉर्टरमध्ये श्रुती शेरीगर हिने दिल्लीचा बचाव भेदताना सुरेख बास्केटस् करीत महाराष्ट्राच्या आशा जिवंत ठेवल्या. मध्यंतरास दिल्ली संघाने २७-२९ अशा दोन गुणांची आघाडी घेतली. मुग्धा अमरावतकर आणि श्रुती यांनी सुरेख समन्वय साधत महाराष्ट्राला जबरदस्त मुसंडी मारून देताना तिसºया क्वॉर्टरअखेर ५४-४६ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शिरीन लिमये हिने अखेरच्या क्वॉर्टरमध्ये निर्णायक गुण नोंदवत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राने ही लढत ७३-५६ अशी जिंकली.