अध्यक्षांनी स्थायी समितीच्या बैठकीतच सुनावले ‘गेटआऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:00 AM2021-09-30T05:00:00+5:302021-09-30T05:00:37+5:30
जिल्हा परिषद सभागृहात दुपारी १२ वाजता स्थायी समितीची बैठक झाली. सभेच्या प्रारंभीच शाळा निर्लेखनाचा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. निर्लेखन करताना शाळांसाठी अधिकच्या वर्गखोल्या बांधकामाचे काम शिक्षण विभागाने केले. परंतु, प्राथमिक शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी जि. प. सदस्यांना विश्वासात घेतले नाही. केवळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन वर्गखोल्यांचे बांधकाम केल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला. यावर जि. प. अध्यक्ष गुरनुले यांनीही नाराजी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पदाधिकाऱ्यांंशी समन्वय न ठेवता कारभार करीत असल्याचा ठपका ठेवून पुढील सर्वसाधारण सभेत प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांची सेवा परतीचा ठराव मंजूर करण्याचा निर्णय बुधवारी जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी सभागृहातच ‘गेटआऊट’ म्हटल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद सभागृहात दुपारी १२ वाजता स्थायी समितीची बैठक झाली. सभेच्या प्रारंभीच शाळा निर्लेखनाचा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. निर्लेखन करताना शाळांसाठी अधिकच्या वर्गखोल्या बांधकामाचे काम शिक्षण विभागाने केले. परंतु, प्राथमिक शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी जि. प. सदस्यांना विश्वासात घेतले नाही. केवळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन वर्गखोल्यांचे बांधकाम केल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला. यावर जि. प. अध्यक्ष गुरनुले यांनीही नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सदस्यांनी त्यांच्यावर विविध प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, शिक्षणाधिकारी लोखंडे हेच सभागृहात मोठ्याने बोलू लागले. त्यामुळे हा सभाध्यक्षांसह सदस्यांचा अपमान असल्याचा ठपका ठेवत सेवा परत घेण्याचा ठराव घेण्यात आला. याबाबत पुढील सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे समजते. स्थायी समितीच्या सभेत घडलेल्या प्रकाराची जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
कोर्धा येथील वादग्रस्त ग्रामसेविका भारमुक्त
नागभीड तालुक्यातील कोर्धा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराचाही प्रश्न चर्चेला आला. आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबित करण्याची मागणी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी केली. यावर मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी लगेच त्यांना भारमुक्त करण्याचा आदेश दिला. घुग्घुस येथील विश्रामगृह जि. प.ने ताब्यात घेण्याचा ठराव झाला. सर्व कक्ष व सभापतींच्या कक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती यांचे छायाचित्र लावण्याची सूचना अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी दिली.
स्मारक बांधकाम आदेश न काढणाऱ्यांविरुद्धही ठराव
माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून शहीद वीर बाबूराव शेडमाके यांचे स्मारक बांधण्यासाठी निधी दिला. मात्र, बांधकाम विभागातील अधिकारी अंबादास नैताम यांनी आदेशच न काढल्याने शासन सेवेतून मुक्त करण्याचा ठराव भाजप गटनेते देवराव भोंगळे यांनी सभेत मांडला.
लाेकहिताची कामे करताना अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्यांचा मान राखला पाहिजे. त्यांच्याशी समन्वय ठेवूनच कर्तव्य बजावण्याचा नियम आहे. चुका करूनही सभागृहात उलट उत्तर देणे योग्य नाही.
- संध्या गुरनुले,
जि. प. अध्यक्ष, चंद्रपूर
स्थायी समितीची सभा शांततेत झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी सभागृहात मला ‘गेटआऊट’ म्हटल्याचा प्रकारच घडला नाही. कुणीतरी अफवा पसरवित आहेत.
- दीपेंद्र लाेखंडे,
शिक्षणाधिकारी प्राथमिक,
जि. प. चंद्रपूर.