महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी, बिहारचा ६५-४१ ने पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:43 AM2018-01-18T03:43:55+5:302018-01-18T03:44:14+5:30
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने बिहारविरुद्ध ६५-४१ अशी दमदार बाजी मारत ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. सामन्यातील चारही क्वार्टरमध्ये वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राने बिहारला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
ललित नहाटा
चेन्नई : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने बिहारविरुद्ध ६५-४१ अशी दमदार बाजी मारत ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. सामन्यातील चारही क्वार्टरमध्ये वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राने बिहारला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीलाच महाराष्ट्राने अपेक्षित विजय मिळवताना प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला. पहिल्या क्वार्टरमध्ये काहीशी सावध सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्राने १३-९ अशी आघाडी मिळवली. दुसºया क्वार्टरमध्ये मात्र आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्राने बिहारला दबावाखाली आणले आणि मध्यंतराला २४-१५ अशी एकतर्फी आघाडी घेतली. अमित गहोलत, राकेश सघवत आणि अॅरोन माँटेरियो या त्रिकूटाने वेगवान खेळ करताना बिहारला आक्रमणाची संधी दिली नाही. तिसºया क्वार्टरमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने आक्रमक खेळ करताना बिहारवर तुफानी हल्ले करता ५६-३४ अशी भक्कम आघाडी मिळवली.
महाराष्ट्राकडून अमितने सर्वाधिक १९ गुण नोंदवले. तसेच अॅरोन आणि राकेश यांनी महत्त्वपूर्ण योगदान देताना प्रत्येकी ९ गुण मिळवले. बिहारकडून रोहित कुमार आणि संजीव कुमार यांनी अनुक्रमे १३ व १२ गुणांची कमाई करत अपयशी झुंज दिली.