सिया, खुशी यांनी प्रभावित केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:38 AM2018-06-02T03:38:03+5:302018-06-02T03:38:03+5:30
‘बीडब्ल्यूबी मुलींच्या शिबिराचा खूप चांगला अनुभव असून युवा खेळाडूंनी प्रभावित केले आहे.
रोहित नाईक
नवी दिल्ली : ‘बीडब्ल्यूबी मुलींच्या शिबिराचा खूप चांगला अनुभव असून युवा खेळाडूंनी प्रभावित केले आहे. चीन, आॅस्टेÑलिया आणि इतर देशांतील खेळाडूंसह भारताच्या मुलींचा खेळ पाहणे शानदार ठरले आहे. विशेष म्हणजे भारताच्या खुशी डोंगरे आणि सिया देवधर या दोन मुलींनी लक्ष वेधले असून त्यांचे बास्केटबॉलमधील भविष्य उज्ज्वल आहे,’ अशा शब्दांमध्ये दोन वेळची महिला एनबीए चॅम्पियन रुथ रिले हिने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले.
ग्रेटर नोएडा येथील भारतीय एनबीए अकादमी येथे सुरु असलेल्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स’ (बीडब्ल्यूबी) शिबिरामध्ये १७ वर्षांखालील मुली रुथच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये १६ देशांतील ६६ खेळाडूंनी सहभाग घेतला असून यात १८ भारतीय मुलींचा समावेश आहे. यानिमित्ताने रुथने ‘लोकमत’शी संवाद साधला. भारतीय मुलींच्या कामगिरीविषयी रुथने म्हटले की, ‘युवा भारतीय मुलींनी प्रभावित केले आहे. हे माझे भारतातील पहिलेच शिबिर असल्याने भविष्यात या मुली कितपत मजल मारतील आत्ताच सांगता येणार नाही, पण या सर्वांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. तांत्रिकदृष्ट्या शूटिंग आणि पासिंगमध्ये सर्व खेळाडू कसलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारतीय मुली कल्पकतेने खेळतात. त्यांना एखादी गोष्ट समजावण्यासाठी केवळ एकदाच सांगावे लागते. त्यानंतर ते आपला खेळ सादर करतात.’
या वेळी रुथने नागपूरच्या सिया देवधर आणि औरंगाबादच्या खुशी डोंगरे यांचे विशेष कौतुक केले. रुथ म्हणाली की, ‘सिया आणि खुशीचा खेळ पाहण्यात वेगळीच मजा आहे. सिया शिबिरातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू आहे. प्रत्येक दिवसागणिक तिचा खेळ सुधारत आहे. ती सर्वोत्तम बचावपटू असून उत्कृष्ट शूटरही आहे. त्याचबरोबर खुशीही तोडीस तोड आहे. ती स्वत:च्या उपस्थितीने आपल्या संघाला मजबूत करते. शिवाय चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण ठेवून गुणांची कमाई करणे तिला आवडते. या दोन्ही खेळाडूंचा खेळ पाहण्यात आनंद आहे.’
त्याचप्रमाणे, ‘सिया व खुशी दोघींचेही भविष्य उज्ज्वल आहे. जर या दोघींनी आपला खेळ असाच बहरत ठेवला, तर त्यांना केवळ भारतीय संघातच नाही, तर यूएसएमध्येही मोठी संधी मिळेल. तसेच, कॉलजनंतर सिया व खुशी व्यावसायिक स्पर्धेतही छाप पाडतील. पण तरी त्यांना अजून आपल्या खेळावर मेहनत घ्यावी लागेल आणि दोघीही मेहनती आहेत,’ असेही रुथने या वेळी सांगितले.