आई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 11:48 AM2018-11-17T11:48:16+5:302018-11-17T11:48:49+5:30
जास्तीत जास्त भारतीय मातांचा एक साधारण सौंदर्य व्यवहार असतो, ज्यात त्या फेसवॉश आणि मॉइश्चरायजरचा वापर अधिक केला जातो.
(Image Credit : The Independent)
भारतीय महिलांमध्ये प्रसुतीनंतर सौंदर्याबाबत विचारांमध्ये बदल होत असल्याचं बघायला मिळालं आहे. एका ब्यूटी सर्वेक्षणातून समोर आले आहे की, ६७ टक्के महिलांचं म्हणनं आहे की प्रसुती झाल्यानंतर त्यांच्या सौंदर्याबाबत विचारांमध्ये बदल झाला. जास्तीत जास्त भारतीय मातांचा एक साधारण सौंदर्य व्यवहार असतो, ज्यात त्या फेसवॉश आणि मॉइश्चरायजरचा वापर अधिक केला जातो.
महिलांशी संबंधित माहिती पुरवणारं प्लॅटफॉर्म मॉमस्प्रेसोने ब्यूटी सर्वे केला. ब्यूटी सर्वेमध्ये २५ ते ४५ वयोगटातील मातांना सहभागी करुन घेतले होते. तीनपैकी दोन मातांनी हे मान्य केलं की, मातृत्वानंतर त्यांच्या सौंदर्य विचारांमध्ये बदल झाला आहे. ५० टक्के मातांनी हे सांगितलं की, सुंदरता ही जन्मापासून असते आणि त्या त्याच्यासाठी काही करु शकत नाहीत. तर ७० टक्के महिला हा विचार करतात की, योग्य उत्पादने वापरुन कोणतीही महिला आकर्षक दिसू शकते.
सर्वेच्या निष्कर्षातून हेही समोर आलं आहे की, ९० टक्के माता खूपसारे कॉस्मेटिक उत्पादने वापरणे टाळतात. कारण त्यांना वाटतं की, यांच्या वापराने त्यांच्या सुंदरतेला पुढे जाऊन नुकसान पोहोचेल. त्यामुळे ४ पैकी ३ महिला या घरगुती उपाय वापरणे पसंत करतात.
त्यासोबतच ७० टक्के मातांनी दावा केला आहे की, त्यांना तरुण दिसण्याचा दबाव अजिबात जाणवत नाही. तसेच यातील ८ टक्के महिलांनी हे सांगितले की, त्यांच्या स्मार्टफोनमध्ये सुंदरता वाढवण्यासाठी काही अॅप्स आहेत. यातील काही महिलांनी मान्य केलं की, सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी त्या कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी इच्छुक आहेत. जवळपास ३० टक्के मातांमध्ये स्ट्रेच मार्क आणि सैल स्तनांची चिंता आहे.
मेकअपसाठी खर्च
मेकअपबाबत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. केवळ ५ टक्के मातांनी सांगितले की, त्या रोज मेकअप करतात. याव्यतिरिक्त सर्वेतून खुलासा झाला की, ६८ टक्के माता मेकअप करण्याबाबत जास्त उत्साही नसतात. हेही समोर आलं की, २० टक्के माता फेशिअल, पील्स, लेजर सारख्या सौंदर्य उपचारावर दर महिन्याला १ हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करतात.