या 6 घरगुती उपायांनी मिळवा केसातील कोंड्यापासून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 10:42 AM2018-05-21T10:42:00+5:302018-05-21T10:42:00+5:30
यावर भरमसाठ पैसा खर्च न करता घरगुती उपायांनीही मात करता येऊ शकते. काही महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून पहा.
केसात कोंडा होणे ही समस्या अनेकांमध्ये बघायला मिळते. केसात कोंडा होणे ही एक गंभीर समस्या असून याकडे दुर्लक्ष करणे फारच चुकीचं ठरेल. ही अगदी समस्या सामान्य वाटत असली तरीही त्यांवर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्यामुळे काही त्वचाविकार उद्भवण्याची शक्यता असते. यावर उपचार म्हणून बाजारातून महागडी उत्पादने विकत घेतली जातात. पण यावर भरमसाठ पैसा खर्च न करता घरगुती उपायांनीही मात करता येऊ शकते. काही महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून पहा.
1) कडूलिंब - पाव कप कडूलिंबाचा रस, नारळाचं दूध व बीटाचा रस एकत्र करून त्यात चमचाभर नारळाचं तेल एकत्र करून टाळूवर मसाज करावा. 20 मिनिटांनी केस हर्बल शाम्पूने धुवावेत. हा प्रयोग आठवड्यातून दोनदा केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.
2) लिंबू - यामध्ये व्हिटामिन सी आणि अॅसिड अधिक प्रमाणात असल्याने कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत होते. त्यामुळे लिंबाची फोड थेट टाळूवर 10-15 मिनिटे चोळावी. नंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.
3) बेकिंग सोडा - हा अल्कलाईन असल्याने टाळूवरील मृत पेशी काढून टाकण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे कोमट पाण्याने केस धुताना बेकिंग पावडर पाण्यात मिसळून जाडसर पेस्ट बनवावी. व टाळूवर हलका मसाज करावा. त्यानंतर नेहमीच्या शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.
4) कोरफडीचा गर - कोरफडीचा गर थंड आणि अॅन्टीबॅक्टेरियल असल्याने कोंड्याची समस्या कमी होते. मात्र हा गर लावताना केसांना तेल नाही याची काळजी घ्या. केस धुताना सौम्य शाम्पू किंवा पाण्याचा वापर करा.
5) मेथीचे दाणे - 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून चमचाभर अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मिसळावे. हे मिश्रण 30 मिनिटे केसांवर लावून ठेवावे. नंतर एखाद्या सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.
6) रिठा - रात्रभर 10-15 रिठा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या रिठ्याची पावडर तयार करा. रिठा पावडर पाण्यात उकळून गाळून घ्या. त्यामध्ये आवळ्याची पावडर किंवा रस मिश्रित करा आणि तयार मिश्रण टाळूवर हलक्या हाताने लावा. अर्धा तासाने ही पेस्ट सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवावी.