पार्लरमध्ये नाहीतर घरीच करा फेशिअल; स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 01:20 PM2019-11-05T13:20:36+5:302019-11-05T13:21:11+5:30
महिला आपल्या त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी अनेक उपाय करतात. त्यासाठी महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स आणि बाजारात मिळणाऱ्या कॉस्मॅटिक उत्पादनांचाही आधार घेण्यात येतो.
महिला आपल्या त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी अनेक उपाय करतात. त्यासाठी महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स आणि बाजारात मिळणाऱ्या कॉस्मॅटिक उत्पादनांचाही आधार घेण्यात येतो. त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणं गरजेचं असतं. अशातच आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणत्याही पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही किंवा फार पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण हा उपाय करण्यासाठी लागणारं साहित्य घरात अगदी सहज उपलब्ध होतं.
आज आम्ही तुम्हाला मध आणि दही या पदार्थांचा वापर करून तयार होणाऱ्या फेसपॅकबाबत सांगणार आहोत. जे तुमच्या त्वचेला सॉफ्ट आणि मुलायम बनवण्यासाठी मदत करतात.
दही आणि मधाचा फेसपॅक
एका बाउलमध्ये दही एकत्र करून त्यामध्ये 2 कॅप्सूल व्हिटॅमिन-ई आणि एक चमचा मध एकत्र करा. तयार फेसपॅकने चेहऱ्यावर मसाज करा. गरज असेल तर तुम्ही हाताऐवजी कापसाचाही वापर करू शकता. 10 ते 15 मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर कोरफडीच्या जेलच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज करा.
दही आणि कोरफडीचा गर
फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे दह्यामध्ये एक टेबलस्पून कोरफडीचं जेल, मध आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. तयार पॅक चेहऱ्यावर 10 मिनिटांपर्यंत ठेवा. सुकल्यानंतर कोमट पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
बेसन, दही आणि हळद
एक चमचा बेसनामध्ये 2 चमचे दही आणि एक चमचा हळद पावडर व्यवस्थित एकत्र करा. पेस्ट तयार करण्यासाठी त्यामध्ये एक चमचा दूधही एकत्र करू शकता. पेस्ट चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर दोन्ही हातांनी स्क्रब करत फेसपॅक चेहऱ्यावरून काढून टाका. त्यानंतर त्वचेला मॉयश्चरायझर लावा.
काकडी आणि दही
चेहऱ्याचा लूक खुलवण्यासाठी तसेच फ्रेश दिसण्यासाठी चेहऱ्यावर काकडी, मध आणि दही लावा. एका बाउलमध्ये 1 चमचा दही घ्या. त्यामध्ये किसलेली काकडी आणि मध एकत्र करा. या फेसपॅकचा वापर आठवड्यातून एकदा नक्की करा. यामुळे चेहऱ्याची त्वचा तजेलदार होण्यासोबतच डाग दूर करण्यासाठीही मदत होते.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)