केसांचं सौंदर्य वाढवायचंय?; 'लसणाचं तेल' करेल मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 11:05 AM2019-09-10T11:05:11+5:302019-09-10T11:10:26+5:30
लसणामध्ये आढळून येणारं सेलेनियम तत्व आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढविण्याचं काम करतं. तसेच हे तेल केसांच्या मुळांशी लावल्यामुळे केसांना आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होते.
लसणामध्ये आढळून येणारं सेलेनियम तत्व आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढविण्याचं काम करतं. तसेच हे तेल केसांच्या मुळांशी लावल्यामुळे केसांना आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होते. लसणाच्या तेलामध्ये अस्तित्त्वात असलेलं सल्फर केसांसाठी अत्यंत लाभदायक असतं. हे डोक्याच्या त्वचेवर असलेल्या रोमछिद्रांमध्ये जाऊन ते स्वच्छ करण्याचं काम करतात. तसेच केसांच्या मजबुतीसाठी आणि केस गळण्यापासून रोखण्यासाठीही मदत करतात.
एवढचं नाहीतर लसणाचं तेल केसांना लावल्याने इरिटेटेज स्कॅल्पही शांत होतात आणि केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते. तुम्ही लसणाचं तेल दुसऱ्या तेलासोबत एकत्र करूनही वापरू शकता. तसेच तुम्ही या तेलाचा वापर करून हेअर मास्क तयार करू शकतो.
- लसणाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल केसांच्या लांबीनुसार आणि तुमच्या आवश्यकतेनुसार अर्धं-अर्धं एकत्र करा. आता हे तेल केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मसाज करा. त्याचबरोबर संपूर्ण केसांवर हे तेल व्यवस्थित लावा. अर्ध्या तासाने शॅम्पूच्या मदतीने केस धुवून घ्या.
- लसणाच्या तेलामध्ये मध एकत्र करून तुम्ही घरची केसांसाठी हेअर मास्क तयार करू शकता. केसांच्या लांबीनुसार मध घ्या आणि त्यामध्ये थोडं लसणाचं तेल एकत्र करा. आता तयार हेअर मास्क 30 मिनिटांपर्यंत केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुवून घ्या.
- जर तुमच्याकडे लसणाचं तेल नसेल तर तुम्ही लसणाच्या काही पाकळ्या वाटून घ्या आणि त्यामध्ये कोमट खोबऱ्याचं तेल एकत्र करा. तयार मिश्रण केसांना लावा आणि 30 मिनिटांनी शॅम्पूच्या मदतीने केस धुवून टाका. हा उपायही केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. यामुळे केस आणि डोक्याच्या त्वचेला व्हिटॅमिन सी, सल्फर, केराटिन मिळण्यास मदत होते. तसेच केस मजबुत होतात.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)