जखमेचे किंवा जळाल्याचे डाग दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 11:02 AM2018-07-05T11:02:49+5:302018-07-05T11:04:38+5:30
काही असेही घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने हे डाग दूर केले जाऊ शकतात. या उपायांनी जरी हे डाग पूर्णपणे दूर झाले नाही तरी कमी नक्कीच होतील. चला जाणून घेऊया काय आहे हे उपाय....
कोणतीही जखम झाल्यावर त्वचेवर अनेकदा त्या जखमेचे डाग तसेच राहतात. कधी कधी हे डाग फारच डार्क किंवा मोठे असल्याने स्पष्टपणे दिसून पडतात. हे डाग दूर करण्यासाठी बाजारात वेगवेगळी उत्पादने मिळतात. पण अनेकदा याचाही फायदा होताना दिसत नाही. शेवटी अनेकजण सर्जरीच्या माध्यमातून हे डाग दूर करतात. पण काही असेही घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने हे डाग दूर केले जाऊ शकतात. या उपायांनी जरी हे डाग पूर्णपणे दूर झाले नाही तरी कमी नक्कीच होतील. चला जाणून घेऊया काय आहे हे उपाय....
1) लिंबू
लिंबामध्ये त्वचेला उजळ करण्याचे गुण असतात. लिंबू हे एकप्रकारचं नैसर्गिक ब्लीचिंग मानलं जातं. पण लिंबू कधीही कापल्या गेलेल्या जागेवर किंवा जखमेवर लावू नका. लिंबाचा सर कॉटनच्या मदतीने जखमेच्या डागावर लावावा. एक आठवडा रोज असे केल्यास ते डाग कमी होतील.
2) हळद
लिंबाप्रमाणेच हळदीलाही नैसर्गिक ब्लीचिंग मानलं जातं. हळदीच्या मदतीने तुम्ही त्वचा उजळवून नैसर्गिक रंग पुन्हा मिळवू शकता. हळदीमध्ये मध आणि दही मिश्रित करुन जखमेवर लावा. काही दिवस हा उपाय केल्यास जखमेचे डाग दूर होतील.
3) मध
मध त्वचेसाठी फार उपयुक्त मानलं जातं. हे सुद्धा जखमेचे डाग दूर करण्यास फायदेशीर ठरतं. पण याचा प्रभाव वाढवण्यासाठी मधात लिंबाचा रस मिश्रित करुन जखमेवर लावावा.
4) काकडी
त्वचा मुलायम करण्यासाठी आणि हायड्रेट करण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते. याचा वापर करुन जखमेचे डागही दूर केले जाऊ शकतात. तुम्ही काकडीची पेस्ट तयार करुन डागांवर लावा किंवा थेट काकडी जखमेच्या डागावर घासा.
5) चंदन
चंदनाचाही त्वचेसाठी वेगवेगळा फायदा होतो. जखमेचे डाग दूर करण्यासाठीही चंदन फायदेशीर आहे. 2 चमचे दुधात चंदन पावडर आणि गुलाबजल मिश्रित करा. ही पेस्ट जखमेच्या डागावर लावा आणि कोरडं झाल्यानंतर धुवून घ्या. हा उपाय काही दिवस करावा लागेल.
6) कोरफड
त्वचेसंबंधी कोणतीही समस्या असेल तर कोरफडीचा उपाय करायला सांगितलं जातं. जखमेच्या डागावर थेट कोरफड लावा. याने काही दिवसातच जखमेचे डाग कमी होतील.