बदलत्या वातावरणात संवेदनशील आणि तेलकट त्वचेची अशी घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:14 PM2019-03-25T13:14:31+5:302019-03-25T13:17:17+5:30
वातावरणातही बदल होतो आहे आणि सोबतच त्वचेच्या गरजाही बदलत आहेत. या दिवसात खासकरून जास्त त्रास त्या लोकांना होऊ शकतो ज्यांची त्वचा संवेदनशील आणि ऑयली म्हणजेच तेलकट आहे.
(Image Credit : Glamour)
वातावरणातही बदल होतो आहे आणि सोबतच त्वचेच्या गरजाही बदलत आहेत. या दिवसात खासकरून जास्त त्रास त्या लोकांना होऊ शकतो ज्यांची त्वचा संवेदनशील आणि ऑयली म्हणजेच तेलकट आहे. अशावेळी बदलत्या वातावरणात त्वचेची काळजीही अधिक जास्त घ्यावी लागते. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
कशी घ्याल काळजी?
संवेदनशील आणि तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा. आतापर्यंत हिवाळा होता तर सामान्यपणे पाणी कमी पिलं जातं. पण उन्हाळा सुरू होताच शरीराची पाण्याची गरज वाढते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचेवर नैसर्गिक उजळपणा बघायला मिळतो.
घरगुती उपाय
बाजारात प्रत्येक त्वचेच्या प्रकारानुसार वेगवेगळे फेसपॅक उपलब्ध आहेत. पण यात केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे घरी तयार करण्यात आलेले फेसपॅक चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि सुंदरता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. याने काही साइड इफेक्टही होणार नाहीत.
ओट्स स्क्रब आणि पॅक
ओट्स स्क्रब तयार करण्यासाठी २ चमचे ओट्स, एक चमचा मध, संत्र्याच्या सालीचं पावडर आणि गुलाबजल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा. त्यानंतर पेस्ट १० मिनिटे तशीच चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर यावर कॉटनच्या मदतीने किंवा पाणी वा गुलाबजल लावून पुन्हा हलक्या हाताने स्क्रब करा. काही वेळाने चेहरा धुवून घ्या.
तांदळाचं पीठ आणि दुधाचा पॅक
तेलकट त्वचा असलेल्यांसाठी तांदूळ आणि दुधाचा फेसपॅक फार फायदेशीर ठरू शकतो. याने त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेतलं जातं. तसेच याने तुम्ही स्क्रब करू शकता. यासाठी तांदळाच्या पीठामध्ये दूध टाकून घट्ट पेस्ट तयार करा. हे पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर पाण्याचे चेहरा धुवा.
मसूरच्या डाळीचा स्क्रब
बारीक केलेली मसूर डाळ, तांदळाचं पीठ, गुलाबजल आणि मध एकत्र करा. ही पेस्ट ५ ते १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. चेहरा चमकदार आणि मुलायम होईल.
(टिप - वरील कोणत्याही उपायाने तुम्ही सुंदर व्हाल किंवा तुमची समस्या दूर होईल असा दावा आम्ही करत नाही. वरील गोष्टी केवळ माहिती म्हणून देत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे याचा प्रत्येकावर फरक दिसेल असं नाही. अशात तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही उपाय करू नका)