सेलिब्रिटींनाही ग्रासले ‘डेंग्यू’ने !!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2016 10:32 AM2016-09-17T10:32:21+5:302016-09-17T16:02:21+5:30
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो.
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो.
‘कहानी २’ची शूटिंग आटोपून विद्या बालन नुकतीच अमेरिकेतून मुंबईला परतली. मात्र तिला लगेच ‘डेग्यू’ची लागण झाली. विद्यावर घरीच उपचार सुरू असून डॉक्टरांनी तिला १० दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
डेग्यूची लागण ही सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रू वस्तीत राहणा-या सेलिब्रिटींनाही होऊ शकते. आजच्या फीचरमधून आपण हेच जाणून घेणार आहोत की, आजपर्यंत कोणकोणत्या सेलिब्रिटींना डेंग्यूची लागण झाली आहे.
* रणवीर सिंग -
आॅक्टोबर २०१३ मध्ये कलकत्त्यातील दुर्गापूर परिसरात ‘गुंडे’ चित्रपटाची शूटिंग दरम्यान रणवीर सिंगला डेंगूची लागण झाली होती. त्याला तात्काळ मुंबई येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
* रिषी कपूर-
गेल्यावर्षी रिषी कपूरलाही डेग्यूची लागण झाली होती. काही दिवसानंतर उपचार झाल्यावर रिषी कपूर बरा झाला होता.
* लिजा हेडन-
भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री लिजा हेडन हिलादेखील दोन वर्षापूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. अक्षय कुमार सोबतच्या ‘द शौकिन्स’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिला तीव्र ताप चढला होता. उपचारार्थ दाखल केले असता डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते.
* पूजा हेगडे-
मोहेंजोदडो चित्रपटाची नायिका पूजा हेगडे ही ह्याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तापाने फणफणली होती. तिच्यावर निदान केल्यावर तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.
* निखिल चिनापा-
सुप्रसिद्ध इंडियन रेडिओ आणि व्हिडिओ जॉकी निखिल चिनापा ह्याला आॅक्टोबर २०१५ मध्ये डेंग्यू झाला होता. शिलॉँगला एका डान्स प्रोग्रॅमसाठी जात असताना त्याला ही लागण झाली होती. काही दिवस त्याने तिथेच उपचार घेतले होते.
* नवाजुद्दीन सिद्दिकी-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला आॅक्टोबर २०१५ मध्ये डेंग्यूने ग्रासले होते. सुरूवातीला त्याच्यावर व्हायरल फिवर आणि थ्रोट इन्फेक्शनवर उपचार करण्यात आले होते, मात्र तब्बेत अधिकच खालावल्याने विशेष निदान करण्यात आले व त्यात त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.
* यश चोप्राने गमावला जीव-
सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता यश चोप्राला डेंग्यूमुळे आपला जीव गमवावा लागला. २०१२ यावर्षी त्यांना डेंग्यूने ग्रासले. या आजारामुळे त्यांचे कित्येक अवयव निकामी झाले होते. त्यामुळे त्यांचे निधन झाले. ते त्यावेळी ८० वर्षाचे होते.
सेलिब्रिटींच्या घरी सापडल्या डासाच्या अळ्या-
नुकतेच अभिनेता शाहिद कपूर याच्या बंगलाच्या परिसरात साचलेल्या पाण्यात इडिस इजिप्ती डासाच्या अळ्या सापडल्याचे वृत्त असून मुंबई महानगरपालिकेने शाहिदला नोटिस दिली असल्याचे समजते. सप्टेंबर २०१५ मध्येही जुही चावला, अनिल कपूर, जितेंद्र आणि गायक अमित कुमार यांच्या बंगला परिसरातही ह्या डासांच्या अळ्या आढळल्या होत्या. त्यावेळीदेखील त्यांना महानगरपालिकेतर्फे नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
अशी घ्या काळजी
औषधोपचार
ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये (४-५ दिवसांपेक्षा जास्त). त्यानंतर किंवा त्यापूर्वी पेशंटला डॉक्टरांकडे घेउन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.
प्रतिबंध
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.
औषधे
या विषाणूवर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.
ravindra.more@lokmat.com