हिवाळ्यात हातापायांना येणारी खाज आणि सुज रोखण्यासाठी करा 'हे' उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 01:59 PM2020-01-03T13:59:49+5:302020-01-03T14:04:26+5:30
हिवाळ्यात हातापायांना सुज आणि खाज येण्याची समस्या जास्त उद्भवते.
हिवाळ्यात हातापायांना सुज आणि खाज येण्याची समस्या जास्त उद्भवते. अर्थात यात गंभीर असे काही नाही. हिवाळ्यात असा त्रास होणे सामान्य बाब आहे. पण एकदा जर खाज यायला सुरूवात झाली. तर त्यामुळे तुम्हाला त्वचेशी निगडीत समस्या सुद्धा उद्भवू शकतात. तसंच अनेकदा थंडी सहन न झाल्यामुळे हातापायांना सुज येते आणि त्यामुळे हात किंवा पाय दुखायला लागतात. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या उद्भवत असेल तर आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःच आरोग्य चांगलं ठेवू शकता. तसंच कोणत्याही शारीरीक तक्रारीशिवाय थंडीची मजा घेऊ शकता.
थंड पाणी टाळा
हिवाळ्यात हातांपायांना जी खाज किंवा सूज येत असते त्याला चिलब्लेन, पेर्नियो आणि पेरनिओसिस असं सुध्दा म्हटलं जातं. थंडीच्या संपर्कामुळे खाज येते. जर तुम्हाला तीव्रतेने खाज येत असेल तर जास्त जोरात खाजवू नका किंवा मसाज करू नका. तर शरीराच्या ज्या भागांवर खाज येत आहे. त्या भागांना गरम ठेवण्याचा प्रयत्न करा. असं झाल्यास थंड पाण्यात हात घालू नका. त्यामुळे त्रास जास्त होण्याची शक्यता असते.
मॉईश्चरचा वापर
जर तुम्हाला हातांना खाज येत असेल तर क्रीम लावा. हातांना, पायांना जास्त कोरडे होऊ देवू नका. कारण त्यामुळे खाज तर येईलच पण खाजवल्यानंतर रक्त सुद्धा येईल. त्यासाठी हाता-पायांना मॉईश्चराईजर लावा किंवा बॉडी लोशन लावा.
व्यायाम करा.
अनेकदा खाज येण्याचं मुख्य कारण हातापायांमध्ये रक्तपुरवठा कमी असणे. हे सुध्दा असू शकतं.यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला खाज येण्याचे प्रमाण कमी होईल. कारण व्यायाम केल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो. त्यामुळे स्नायू मोकळे चांगले राहतात. त्यामुळे हातापायांना सूज येण्यापासून रोखता येऊ शकतं.
त्वचेची काळजी
शक्यतो थंडीच्या वातावरणात बाहेर पडत असताना पाय आणि हात संपूर्णपणे कव्हर करा. कारण त्यामुळे कोरडे पडण्याची शक्यता असते. अनेकजण शरीर संपूर्ण कव्हर करत नसल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या समस्या उद्भवतात.