केसगळती थांबवण्यासाठी पुरुषांनी 'या' गोष्टींची घ्यावी काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:59 AM2018-08-21T11:59:50+5:302018-08-21T12:00:18+5:30
केसगळती थांबवण्यासाठी अनेक उपाय केले जात असले तरी याने केसगळतीची समस्या दूर होईलच असे नाही.
आजकाल केसगळतीची समस्या होणं एक मोठी समस्या झाली आहे. कमी वयात अनेकांना टक्कल पडू लागलं आहे. केसगळती थांबवण्यासाठी अनेक उपाय केले जात असले तरी याने केसगळतीची समस्या दूर होईलच असे नाही. प्रदुषण आणि योग्य आहार न घेणे यामुळे केसगळती ही समस्या अधिक वाढते. त्यामुळे केसगळती रोखण्यासाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी काय करावे हे खालीलप्रमाणे सांगता येईल.
रोज शॅम्पू करू नका
केसांची जर काळजी घ्यायची असेल तर केसांना रोज शॅम्पू करु नका. आठवड्यातून केवळ दोन ते तीन वेळाच शॅम्पू करायला हवं. याने केस चांगले राहतील. अनेकदा पाहिलं गेलंय की, केस धुतांना जोरजोरात घासून धुतात. पण तसे करणे चुकीचे आहे. अनेकजण केस कोरडे करतानाही फार जोरात घासतात. याने केसगळती जास्त होते. त्यामुळे केस धुतांना ते हळुवार धुवावीत.
हेअर ड्रायरचा वापर घातक
आजकाल पुरुष आपल्या केसांसाठी हेअड ड्रायरचा वापर करतात. याने केस तर चांगले होतात पण केसांना याने नुकसानही होते. याने केस कमजोर होऊ लागतात. त्यामुळे केस तसेच नैसर्गिक पद्धतीने सुकू द्यावे.
केमिकल असलेले हेअर प्रॉडक्ट टाळा
बाजारात उपलब्ध असलेले अनेक हेअर प्रॉडक्ट हे तुमच्या केसांसाठी फार घातक ठरु शकतात. याचा जर प्रमाणापेक्षा जास्त वापर केला तर केस कमजोर होतात आणि तुटू लागतात. त्यामुळे केसांना हेअर जेल, हेअर वॅक्स, हेअर स्प्रे आणि इतर हेअर प्रॉडक्ट्स वापरणे टाळावे.
अंड्याच्या कंडीशनरचा वापर करा
केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अंड्यांचं कंडीशनर फार उपयोगात पडतं. अंड्यांमध्ये प्रोटीन आणि मिनरल्स आढळतात ज्यातून केसांना पौष्टीक तत्व मिळतात. केसांना अंडी लावल्याने केस मजबूत, मुलायम होतात. त्यामुळे महिन्यातून एकदा अंड्यांच कंडीशनर नक्की वापरा.
क्लोरीनने केसांची काळजी घ्या
क्लोरीन तुमच्या केसांना नुकसानकारक आहे. त्यामुळे पुरुषांनी क्लोरीनच्या हानिकारक प्रभावापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाण्याने केस धुवावे. स्वीमिंग पूलमध्ये जाण्याआधी स्वीमिंग कॅप किंवा कंडीशनरचा थोडा वापर करावा.